लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात गुरुवारी ओमायक्रॉनचे ६४ नवे रुग्ण सापडले. तामिळनाडूमध्ये ३३, तेलंगणात १४, कर्नाटकात १२, केरळमध्ये ५ नवे रुग्ण आढळल्याने या विषाणूच्या रुग्णांची एकूण संख्या ३२५ वर पोहोचली. ओमायक्रॉन १६ राज्ये, केंद्रशासित राज्यांमध्ये पसरला आहे. महाराष्ट्रात नवे २३ रूग्ण आढळल्याने ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ८८ इतका आहे.
तमिळनाडूमध्ये ओमायक्रॉनचे बरेच रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नव्या विषाणूच्या ५७ संशयास्पद रुग्णांपैकी ३४ जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले, तर बाकीच्यांचे अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. दोन अल्पवयीन मुले वगळता सर्वांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मोठ्या संख्येने रुग्ण आढळले, तरी घाबरून जाऊ नये, असे आवाहन तमिळनाडू सरकारने केले आहे.
राज्यात आज २३ बाधित
महाराष्ट्रात गुरुवारी ओमायक्रॉनचे २३ रुग्ण आढळले आहेत. यात पुण्यातील १३ म्हणजेच पुणे मनपा आणि पुणे ग्रामीण येथील प्रत्येकी ३, तर पिंपरी चिंचवडमधील ७ रुग्णांचा समावेश आहे. अन्य रुग्णांमध्ये मुंबई ५, उस्मानाबाद २, ठाणे मनपा, नागपूर मनपा आणि मीरा-भाईंदर मनपा प्रत्येक १ रुग्ण आढळला आहे. नव्या रुग्णांमध्ये संसर्गाची प्रारंभिक कोणतीच लक्षणे नव्हती, पण नंतर त्यांना घसा खवखवणे, चक्कर येणे असा त्रास होत आहे. परंतु या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
- देशभरात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ७,४९५ नवे रुग्ण सापडले असून, ४३४ जणांचा मृत्यू झाला.
- कोरोना रुग्णांची एकूण आकडेवारी तीन कोटी ४७ लाख ६५ हजार ९७६ झाली आहे व तीन कोटी ४२ लाख ८ हजार ९२६ जण बरे झाले. - ७८,२९१ जण उपचार घेत आहेत. मरण पावलेल्यांची संख्या चार लाख ७८ हजार ७५९ वर पोहोचली आहे.