नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान आता नव्याने आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान कोरोनातून बरं होण्यासाठी अजब उपाय केले जात आहेत. विविध सल्ले देण्यात येत आहेत. यातच आता भाजपा नेत्यांच्या विधानांची भर पडली आहे. ओमायक्रॉनने टेन्शन वाढवलेलं असताना भाजपा नेत्याने एक अजब विधान केलं आहे. "लिंबाच्या रसाने कोरोना पळून जाईल" असं म्हटलं आहे.
माजी मंत्री देवी सिंह भाटी (BJP Devi Singh Bhati) यांनी कोरोनावरील उपायांबाबत अजब विधान केले. "लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते" असा दावा त्यांनी केला. जोधपूर सर्किट हाऊस प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना असं म्हटलं आहे. "लिंबाच्या रसाचे दोन थेंब हे नाकामध्ये टाका आणि पाच सेकंद ठेवा, पाच मिनिटांनंतर कोरोना हळू हळू कमी होईल. दोन तासांनी तुम्हा ऑक्सिजन सपोर्टदेखील गरज भासणार नाही. तसेच रुग्णालयात असल्यास दोन तीन दिवसांनी डिस्चार्ज देखील मिळेल. अॅलोपथीमध्ये कोरोनावर उपचार नाहीत" असं देखील देवी सिंह भाटी यांनी म्हटलं आहे.
"अॅलोपथीमध्ये कोविड 19 वर कोणताही इलाज नाही"
आयुर्वेदाचं महत्त्व सांगताना भाटी यांनी अॅलोपथीबाबत बेछूट विधान केले. "अॅलोपथीमध्ये कोविड 19 वर कोणताही इलाज नाही. कोविड होऊन अनेक डॉक्टरांचाही मृत्यू झाला आहे. अशावेळी आयुर्वेद पद्धतीवर विश्वास दाखवायला हवा. आयुर्वेदात प्रत्येक आजारावर मात करण्याची क्षमता आहे. लिंबाचे दोन थेंबही कोरोनातून बरे होण्यास फायदेशीर ठरतात" असं म्हटलं आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं. त्याने इम्युनिटी वाढण्यास मदत होते. इम्युनिटी चांगली असेल तर कोरोनाचा प्रतिकार करताना फायदा होतो. मात्र फक्त लिंबाचा रस हा कोरोनावरील उपाय नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"टंट्या मामाचं ताबीज करणार रक्षण, कोणताही आजार होईल बरा"
सांस्कृतिक व पर्यटन मंत्री उषा ठाकूर (Usha Thakur) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. तसेच त्यांनी रोगापासून संरक्षण होण्यासाठी लोकांना अजब सल्ला दिला आहे. सध्या ठाकूर यांच्या विधानाचीच जोरदार चर्चा रंगली आहे. "टंट्या मामाचं ताबीज आपलं संरक्षण करेल. कोरोना काळात लाखोंची गर्दी एकत्र आली तरी मामाचं ताबीज असल्यामुळे कोणालाही काहीही होणार नाही, कोणताही आजार असेल तर तो देखील बरा होईल" असं विधान आता उषा ठाकूर यांनी केलं आहे. मध्यप्रदेशमध्ये टंट्या मामा भिल यांचा बलिदान दिवस दरवर्षी 4 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. आदिवासी समाजातील लाखो बांधव यावेळी एकत्र येत असतात. सर्वसामान्य नागरिकांसाठी आस्थेचं स्थान असलेल्या या उत्सवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमू नये, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान उषा ठाकूर यांनी हे विधान केलं आहे.