नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,822 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 220 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनने चिंतेत भर टाकली आहे. देशामध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. ओमायक्रॉनला घाबरून एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील छतरपूर येथील एका कापड व्यापाऱ्याने कोरोना, ओमायक्रॉनला घाबरून विष घेतलं केले. या भयंकर प्रकाराची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर व्यापाऱ्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे तणाव असल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. छतरपूर जिल्ह्यातील खडगाय गावात राहणारे कापड व्यापारी अंशुल विनय शर्मा यांचे गावातच दुकान आहे.
"पहिला नोटाबंदी मग कोरोना नंतर लॉकडाऊन"
कोरोनामुळे व्यापाऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. भविष्यासाठी साठवून ठेवलेले सर्व पैसे देखील संपले. काही पैसे होते त्यातून त्यांनी नवीन माल आणला. अशा स्थितीत तिसरी लाट आल्यावर पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची त्यांनी भीती वाटू लागली. कुटुंबाची चिंता सतावू लागली. याच तणावातून व्यापाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. "पहिला नोटाबंदी मग कोरोना नंतर लॉकडाऊन तसेच कोरोनाची दुसरी लाट... सामान्य माणूस आणि व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. आधीच तुटलो आहे आता हिंमत नाही"
"व्यवसाय आणि कौटुंबिक पालनपोषणाच्या काळजीने मी घाबरलो"
"आधीच झालेलं मोठं नुकसान. दोन वर्षांपूर्वीच लग्न झालं आहे. दीड वर्षाची मुलगी आहे. व्यवसाय आणि कौटुंबिक पालनपोषणाच्या काळजीने मी खूप जास्त घाबरलो होतो" अशी माहिती व्य़ापाऱ्याने दिली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ओमायक्रॉनच्या भीतीने प्राध्यापकाने पत्नी आणि मुलांची हत्या केली आहे. त्याच्या खोलीतून एक अतिशय धक्कादायक नोट सापडली आहे. त्यात प्राध्यापकाने ओमाय़क्रॉन सर्वांना मारेल. यापुढे मृतदेहांची गणना नाही असं म्हटलं आहे. पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर प्राध्यापकाने आपल्या भावाला व्हॉट्सएपवरून घटनेची माहिती दिली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.