लखनौ - एनडीएचा घटकपक्ष सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओमप्रकाश राजभर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यंमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ओमप्रकाश राजभर यांना मंत्रिमंडळातून तत्काळ प्रभावाने बरखास्त करावे, अशी शिफारस राज्यपाल राम नाईक यांच्याकडे केली होती. त्यानंतर राज्यापालांनी राजभर यांना पदमुक्त केले. दरम्यान, राजभर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच उत्तर प्रदेशात गरिबांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे.
उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदावर असलेले राजभर यांनी अनेकवेळा वादग्रस्त विधाने करून भाजपाला वारंवार अडचणीत आणण्याचे काम केले होते. त्यामुळे अखेर लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर मुख्यंमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ओमप्रकाश राजभर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. मुख्यमंत्र्यांनी राजभर यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची शिफासर केल्यानंतर राज्यपालांनी या शिफारशीच मंजुरी दिली आहे. दरम्यान, '' मी माझ्या पदाचा आधीच राजीनामा दिला होता. आता त्यांच्या मनात जे आहे ते त्यांना करू द्या. मी त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढावी असे ते सांगत होते. असे केले असते तर आमच्या पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात आले असते. जो विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. तोच संपुष्टात आला असता.'' असे राजभर यांनी म्हटले आहे. ओमप्रकाश राजभर यांनी लोकसभा निवडणुकीत घोसीसह एकूण दोन जागांची मागणी केली होती. भाजपाने त्यांना घोसी येथून तिकीट देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र राजभर यांनी भाजपाच्या तिकीटावर लढावे, अशी अट घालण्यात आली. मात्र त्याबाबत राजभर यांनी नकार दिला होता. तसेच उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात 39 उमेदवारा उतरवण्याची घोषणा केली होती. तसेच सातव्या टप्प्यातील मतदानानंतर उत्तर प्रदेशात भाजपाचा दारुण पराभव होईल, तसेच सपा-बसपा आघाडीला विजय मिळेल, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणे जवळपास निश्चित झाले होते.