नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा सर्वात धोकादायक प्रकार समजल्या जाणाऱ्या 'ओमायक्रॉन'ने(Omicron) भारताची चिंता वाढवली आहे. भारतात ओमायक्रॉनची दोन प्रकरणे कर्नाटकात समोर आली आहेत. पण आता दिल्लीतही ओमायक्रॉनग्रस्त रुग्ण आल्याचा संशय व्यक्त होतोय. दिल्लीतील लोकनायक जय प्रकाश(LNJP) रुग्णालयात परदेशातून आलेले 12 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कालपर्यंत हा आकडा 8 होता, पण आज आणखी 4 जणांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली. या सर्व लोकांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.
ओमायक्रॉनची भारतात एंट्री?
देशात दोन जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. चिंतेची बाब म्हणजे ज्या डेल्टा प्रकाराने दुसऱ्या लाटेत हजारो लोकांचा बळी घेतला, हा विषाणू त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त धोकादायक असल्याचे मत अनेक तज्ज्ञ करत आहेत. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितल्यानुसार, कर्नाटकमध्ये नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये 66 आणि 46 वर्षीय पुरुष आहेत.
परदेशातून मुंबईत आलेले 9 प्रवासी कोरोना बाधितओमायक्रॉन संक्रमित दक्षिण आफ्रिकेसह 40 देशांमधून आतापर्यंत 2868 प्रवासी मुंबईत आले आहेत. यापैकी 485 प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये आठ प्रवासी कोरोना बाधित तर एकजण संपर्कात आल्याने बाधित झाल्याचे आढळून आले आहे. यानंतर आता मुंबई महापालिका यंत्रणाही सतर्क झाली आहे.
नियम पाळावे लागतील- डॉ. अशोक
दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयाचे डॉक्टर अशोक सेठ यांनी सांगितले की, ओमायक्रॉन विषाणू प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. या नवीन व्हेरिएंटची म्यूटेशन शक्ती तीव्र आहे. हा विषाणून आणखी स्वरूप बदल्यानंतर अधिक धोकादायक बनू शकतो. डेल्टा व्हेरिएंटवरुन धडा घेऊन लोकांनी कोविडचे सर्व नियम पाळावेत. योग्य काळजी घेतल्यास यापासून वाचता येईल.
निर्बंधांचे नवे पर्व सुरू
ओमायक्रॉनचा धोका पाहता निर्बंधांचे नवे पर्व सुरू झाले आहे. दादरा-नगर हवेली आणि दमण दीवमध्ये 31 डिसेंबरपर्यंत रात्रीचा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिल्लीतील मेट्रोसारख्या सार्वजनिक ठिकाणी लसीचे दोन्ही डोस नसताना प्रवासावर बंदी घालण्याची तयारी सुरू आहे. दिल्ली सरकार या संदर्भात एक प्रस्ताव तयार करत आहे, केंद्र सरकार आता घाबरण्याची गरज नाही असे म्हणत असले तरी कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.