चंद्रयान-3 मोहिमेच्या यशाची चर्चा जगभर होत आहे. 23 ऑगस्ट रोजी चंद्रयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग केलं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस (23 ऑगस्ट) राष्ट्रीय अंतराळ दिवस (National Space Day) म्हणून साजरा करण्याची मोठी घोषणा केली. 23 ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर तिरंगा फडकावला, तो दिवस भारत राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. हा दिवस आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला दोन देशांचा दौरा संपवून शनिवारी मायदेशी परतले आहेत. त्यांनी ग्रीसहून थेट बंगळुरू गाठले आणि इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये शास्त्रज्ञांची भेट घेतली. पंतप्रधानांनी इस्रोच्या वैज्ञानिकांना सलाम केला आणि या मोहिमेसाठी त्यांचे अभिनंदन केले. मोदी म्हणाले, "आपण काय केलं हे देशवासीयांना कळलं पाहिजे. हा प्रवास सोपा नव्हता. मून लँडरचे सॉफ्ट लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी एक आर्टिफिशियल देखील बनवलं. विक्रम लँडरवर उतरून त्याची चाचणी घेण्यात आली. लँडर पोहोचला आहे. तिथे जाण्यासाठी खूप परीक्षा दिल्या, त्यामुळे यश मिळणार हे निश्चित होतं
पीएम मोदी शास्त्रज्ञांना म्हणाले की, "आज जेव्हा मी पाहतो की भारतातील तरुण पिढी विज्ञान, अवकाश आणि नवनिर्मिती या संदर्भात उर्जेने परिपूर्ण आहे, तेव्हा त्यांच्यामागे असे यश आहेत. मंगळयान आणि चंद्रयान आणि गगनयानची तयारी हे यश आहे. आज भारतातील लहान लहान मुलांच्या तोंडी चंद्रयानाचे नाव आहे. भारतातील मुलं आपल्या वैज्ञानिकांमध्ये भविष्य पाहत आहे. तुमचे कर्तृत्व हे देखील आहे की तुम्ही संपूर्ण भारताच्या पिढीला जागृत केलं आहे. अधिक ऊर्जा दिली आहे. आपल्या यशाची खोल छाप सोडली आहे."
"आजपासून रात्रीचा चंद्र पाहणाऱ्या कोणत्याही मुलाला विश्वास बसेल की, माझा देश चंद्रावर पोहोचला आहे, तेवढीच हिंमत आणि चैतन्य त्या मुलामध्ये आहे. आकांक्षांची बीजे पेरली आहेत. ते वटवृक्ष बनतील आणि विकसित भारताचा पाया होतील. तरुण पिढीला सतत प्रेरणा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 23 ऑगस्टला भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला, तो नॅशनल स्पेस डे म्हणून दिवस साजरा केला जाईल. हा दिवस आपल्याला नेहमीच प्रेरणा देईल."
यासोबतच पंतप्रधान म्हणाले की, "चंद्राच्या ज्या भागावर आपले चंद्रयान उतरले आहे, त्या भागाचे नावही भारताने ठरवले आहे. चंद्रयान-3 चा चंद्र लँडर ज्या ठिकाणी उतरला, तो पॉईंट आता 'शिवशक्ती' म्हणून ओळखला जाईल. चंद्रावरील ज्या पॉईंटवर चांद्रयान-2 ने ठसे सोडले त्याला आता 'तिरंगा' म्हटलं जाईल. हा तिरंगा पॉईंट भारताच्या प्रत्येक प्रयत्नाची प्रेरणा बनेल, हा तिरंगा पॉईंट आपल्याला शिकवेल की कोणतंही अपयश अंतिम नसतं." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.