पावसाळ्यात रस्ते आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा हा नेहमीच चर्चेत येतो, अनेकदा यावरून राजकारणही तापतं. खड्ड्यांवरून भीषण अपघात झाल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. अशीच एक घटना आता घडली आहे. उत्तर प्रदेशच्या बलियामधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. एक व्यक्ती कॅमेऱ्यासमोर रस्त्याची दुरावस्था आणि खड्ड्यांच्या समस्येवर बोलत होता. त्याचवेळी त्याच्या मागे एका रिक्षाला खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
एक सर्वसामान्य नागरिक खड्ड्यांमुळे होणाऱ्या समस्यांवर बोलत होता. कॅमेऱ्यासमोर तो प्रतिक्रिया देत असतानाच हा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला. प्रवाशांना घेऊन जाणारी ई-रिक्षा खड्ड्यांमुळे अचानक उलटली. मिळालेल्या माहितीनुसार, एक पत्रकार बलियातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर भाष्य करत होता. त्यावेळी त्याने एका व्यक्तीला खड्ड्यांबद्दल विचारणा केली.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दररोज अनेक रिक्षा पलटी होत असल्याचं परिसरात राहणाऱ्या लोकांनी म्हटलं आहे. दररोज अपघात होत असून त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. तसेच रस्त्यावर भरपूर खड्डे पडले असून त्यात पाणी साचतं. लोकांना ये-जा करणे यामुळे कठीण झाल्याचं देखील प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीने सांगितलं आणि तितक्यातच त्याच्या पाठीमागे झालेला अपघात कॅमेऱ्यात कैद झाला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.