BJP नेत्याच्या मुलाने भारतीयांना बळजबरीने रशियन सैन्यात पाठवले? CBI च्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 09:52 AM2024-03-13T09:52:43+5:302024-03-13T09:53:56+5:30
हे प्रकरण उजेडात आल्यानंतर सीबीआयने देशात अनेक ठिकाणी छापे टाकले आणि या गुन्ह्यात गुंतलेल्या एजंट्सच्या अड्ड्यांवर छापे टाकले.
नवी दिल्ली : नोकरीच्या नावाखाली तरुणांना रशियन सैन्यात भरती करणाऱ्या लोकांचे नेटवर्क भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरले असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. दरम्यान, भाजपा नगरसेविकेचा मुलगा भारतीय तरुणांना रशियन सैन्यात कथितपणे पाठवण्यासाठी विद्यार्थी व्हिसाचा गैरवापर केल्याच्या प्रकरणात सीबीआयच्या रडारवर आला आहे.
इंग्रजी वृत्तपत्र 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील धार येथील नगरसेविका अनिता मुकुट यांचा मुलगा सुयश मुकुट हा या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. मात्र, सध्या या प्रकरणी सुयश मुकुटची कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. सूत्रांचा हवाल्यानुसार, मुकुट कुटुंब मूळचे इंदूरचे आहे आणि सध्या ते धार येथे राहतात, जेथे सुयशचे वडील रमाकांत मुकुट स्थानिक रुग्णालयात जनरल फिजिशियन म्हणून काम करतात. याबाबत वृत्तपत्राने त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
भाजपाचे धार जिल्हाध्यक्ष मनोज सोमाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अनिता मुकुट यांच्या मुलाविरोधातील सीबीआय खटल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्सवरून मिळाली. गेल्या वर्षी मी पदभार स्वीकारला, तेव्हा त्या आधीच नगरसेवक होत्या. मी एवढेच म्हणेन की कायद्याला काम करू द्या, असे मनोज सोमाणी म्हणाले. तसेच, धारचे मुख्य पालिका अधिकारी (सीएमओ) निशिकांत शुल्का यांनी सांगितले की, अनिता मुकुट यांची नगरसेविका म्हणून ही पहिलीच टर्म आहे.
सुयश मुकुटविषयी एक्सवरून माहिती
सुयश मुकुटच्या एक्सवर (X) हँडलवरील बायोमध्ये म्हटले आहे की, 24X7 आरएएस ओव्हरसीज सर्व्हिसेसचे अध्यक्ष आणि संस्थापक असल्याचे लिहिले आहे. आरएएस ओव्हरसीज सर्व्हिसेस हे भारतीय विद्यार्थ्यांना रशियामध्ये बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी (एमबीबीएस) वैद्यकीय अभ्यासात प्रवेश मिळवण्यास मदत करते.
180 लोकांना रशियाला पाठवल्याचा आरोप
सुयश मुकुटच्या 24X7 आरएएस ओव्हरसीज सर्व्हिसेसवर 180 लोकांना रशियाला पाठवल्याचा आरोप आहे, त्यापैकी बहुतेकांना विद्यार्थी व्हिसावर पाठवण्यात आले होते. सीबीआय एफआयआरनुसार, एजंटांनी भारतीयांना रशियन विद्यापीठात प्रवेश मिळवून देतो, अशी फसवणूक केली होती. दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्लीतील सफदरजंग येथील कंपनीचे कार्यालय केवळ कागदावर!
एफआयआरमध्ये इतर कंपनी 24X7 आरएएस ओव्हरसीज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचेही नाव नाही, जी जून 2022 मध्ये सुयश मुकुट आणि त्याचा भाऊ पार्थ मुकुट यांनी संचालक म्हणून उघडली होती. कंपनीचा नोंदणीकृत पत्ता दिल्लीतील सफदरजंग एन्क्लेव्हमधील तळघरात असल्याचे सांगण्यात आले, परंतु जेव्हा इंग्रजी वर्तमानपत्र त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा तेथे कोणतेही कार्यालय आढळले नाही. निवासी इमारतीच्या मालकाने कंपनी किंवा मुकुट कुटुंबाविषयी कोणतीही माहिती नसल्याचा स्पष्टपणे इन्कार केला.
फसवणूक करून रशियन सैन्यात भारतीय तरुणांची भरती
हे प्रकरण उजेडात आल्यानंतर सीबीआयने देशात अनेक ठिकाणी छापे टाकले आणि या गुन्ह्यात गुंतलेल्या एजंट्सच्या अड्ड्यांवर छापे टाकले. सीबीआयने या प्रकरणी अनेक खासगी व्हिसा कन्सल्टन्सी कंपन्या आणि एजंटविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दिल्ली आणि मुंबईसह 13 ठिकाणी छापे टाकले आहेत. छापेमारीत 50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले आहे. या ठिकाणांवरून भरतीशी संबंधित काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. या संदर्भात काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.