18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव टाकरण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. पण, जर तुमचे नाव मतदार यादीत आपोआप आले तर? हे सध्या शक्य नाही, परंतु लवकरच होऊ शकते. केंद्र सरकार असे विधेयक आणण्याच्या तयारीत आहे, ज्यात वयाची 18 वर्षे पूर्ण होताच आपोआप मतदार यादीत नाव टाकले जाईल. एवढंच नाही तर एखाद्याचा मृत्यू झाल्यास, त्याचे नाव मतदार यादीतून आपोआप काढून टाकले जाईल.
विधेयकात काय असेल ?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी जनगणना इमारतीचे उद्घाटन करताना ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की, सरकार संसदेत एक विधेयक आणणार आहे, ज्यामध्ये जन्म आणि मृत्यू नोंदणी मतदार यादीशी जोडण्याची तरतूद असेल. अमित शाह म्हणाले, 'मतदार यादीशी मृत्यू आणि जन्म नोंदणी जोडण्यासाठी विधेयक आणले जाईल. या अंतर्गत एखादी व्यक्ती 18 वर्षांची झाल्यावर त्याचे नाव आपोआप मतदार यादीत जोडले होईल. तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचे नाव मतदार यादीतून काढून टाकले जाईल.'
लायसन्स-पासपोर्ट मिळणेही सोपे होणार जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा, 1969 मध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक आणले जाईल. हे विधेयक आल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट देण्यापासून इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यापर्यंत अनेक गोष्टी अतिशय सोयीस्कर होतील. जन्म-मृत्यूचे दाखले नीट जतन केले, तर जनगणनेच्या मध्यावरच सर्वांगीण विकासाचे नियोजन करणे सोपे जाईल.
हे सगळं कसं होणार?गेल्या वर्षी अमित शहा म्हणाले होते की, पुढील जनगणना पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक असेल. ती 100% अचूक असेल आणि पुढील 25 वर्षांसाठी विकास आराखडा तयार केला जाईल. ई-जनगणनेसाठी एक सॉफ्टवेअर तयार केले जाईल. मोबाईल अॅप्लिकेशनही तयार होईल. याच्या मदतीने लोक घरी बसून त्यांचा डेटा अपडेट करू शकतील. जन्मापासून मृत्यूपर्यंतची तारीख जनगणनेशी जोडली जाईल. मुलाच्या जन्मासोबतच त्याची तारीखही जनगणना कार्यालयात नोंदवली जाईल. तो 18 वर्षांचा झाल्यावर त्याचे नाव आपोआप मतदार यादीत समाविष्ट होईल आणि त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा डेटा आपोआप हटवला जाईल.