"त्यांना लोकशाही वाचवायची असेल तर..."; ECनं राहुल गांधींना बजवलेल्या नोटिशीवर काय म्हणाले खर्गे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 19:15 IST2023-11-23T19:08:27+5:302023-11-23T19:15:11+5:30
"भारतीय टीम विश्वचषक स्पर्धा जिंकत होती, मात्र पनौतीमुळे पराभव झाला," असे म्हणत, राहुल यांनी पीएम मोदींवर टीका केली होता.

"त्यांना लोकशाही वाचवायची असेल तर..."; ECनं राहुल गांधींना बजवलेल्या नोटिशीवर काय म्हणाले खर्गे?
संपूर्ण राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचाराने ढवळून निघाला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच, गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी, क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या झालेल्या पराभवावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. "भारतीय टीम विश्वचषक स्पर्धा जिंकत होती, मात्र पनौतीमुळे पराभव झाला," असे म्हणत, राहुल यांनी पीएम मोदींवर टीका केली होता. त्यांच्या या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने त्यांना आज नोटीस बजावली आहे. यानंतर, आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी, "त्यांना (राहुल गांधींना नोटीस) पाठवू द्या, आम्ही उत्तर देऊ. ही फार मोठी गोष्ट नाही," असे म्हटले आहे.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे -
यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "त्यांना (राहुल गांधींना नोटीस) पाठवू द्या, आम्ही त्याला उत्तर देऊ. ही फार मोठी गोष्ट नाही. फार गंभीर भाष्य करण्यात आलेले नाही. आम्ही नोटिशीला उत्तर देऊ. आज ते निवडणूक काळात ज्या पद्धतीने घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते योग्य नाही. त्यांना लोकशाही वाचवायची असेल, तर त्यांनी एक समान मैदान द्यायला हवे. मात्र या ऐवजी ईडी, सीबीआय आदींचा वापर केला जात आहे..."
#WATCH | Nagpur, Maharashtra: On Election Commission, notice to Rahul Gandhi, Congress National President Mallikarjun Kharge says, "Let them send (notice to Rahul Gandhi) we will answer it. It is not a big deal. There has not been any such severe commentary on anyone. But since… pic.twitter.com/uAJUjWQYus
— ANI (@ANI) November 23, 2023
यासंदर्भात, निवडणूक आयोगाने 25 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहुल गांधी यांच्याकडून उत्तर मागवले आहे. तत्पूर्वी, भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल कारवाईची मागणी केली होती.
राहुल गांधींनी माफी मागावी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात केलेले अपमानास्पद विधान अस्वीकार्य असून त्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडे पोहोचलेल्या शिष्टमंडळात राधामोहन दास अग्रवाल, ओम पाठक आणि इतर नेत्यांचा समावेश होता.