नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. पोलिसांनी झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर, नागालँड काँग्रेसचे कार्याध्यक्ष क्रिडी थेयुनियो आणि समाजवादी पक्षाचे नेते मनोज काका यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी आज हजर राहण्यास सांगितले आहे. या तिन्ही नेत्यांना आज दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजेंस फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) युनिटसमोर हजर व्हावे लागणार आहे.
दरम्यान, याप्रकरणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने मोठी कारवाई झारखंड काँग्रेसचे हँडल बंद केले आहे. याबाबत दिल्ली पोलिसांच्या तपासाची व्याप्ती वाढत आहे. गुजरातपासून नागालँडपर्यंत तपास सुरु आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने आता झारखंड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर, नागालँड काँग्रेसचे कार्याध्यक्ष क्रिडी थेयुनियो आणि समाजवादी पक्षाचे नेते मनोज काका यांना आज हजर राहण्यास सांगितले आहे. या सर्वांना त्यांचे मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे सोबत आणण्यास सांगण्यात आले आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या वकिलांच्या उत्तराने दिल्ली पोलिस समाधानी नसून पुढील कारवाईचा विचार करत असल्याचे समजते. रेवंत रेड्डी यांच्या वकिलाने तेलंगणा काँग्रेसच्या 'एक्स' हँडलपासून स्वतःला लांब केले आहे. तसेच, दिल्ली पोलिसांचे एक पथक सध्या तेलंगणामध्ये असून पुढील आदेशांची प्रतीक्षा करत आहे. बुधवारी रेवंत रेड्डी यांचे वकील ISFO युनिटसमोर हजर झाले. रेवंत रेड्डी यांचे वकील सौम्या गुप्ता यांनी दिल्ली पोलिसांच्या नोटीसला उत्तर देताना सांगितले की, प्रश्नात असलेले ट्विटर हँडल तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे नाही. रेवंत रेड्डी यांना तेलंगणा काँग्रेसचे एक्स हँडल कोण चालवते हे माहीत नाही.
गेल्या काही दिवसांपूर्वी अमित शाह यांचा आरक्षणासंबंधीचा एक बनावट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. बनावट व्हिडीओमध्ये भाजपा नेते अमित शाह सरकार स्थापन होताच एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल असे सांगत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यावरून अमित शाह यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. काँग्रेस खोटी माहिती पसरवून लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. तसेच, याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आयपीसीच्या कलम 153/1530ए/465/469/171जी आणि आयटी कायद्याच्या कलम 66सी अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.