प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजप-काँग्रेसने लावला कुमाऊंत जोर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 01:14 PM2022-02-13T13:14:18+5:302022-02-13T13:15:08+5:30
विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उधमसिंग नगर जिल्ह्यातील खटीमा मतदारसंघातून, तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या निवडणूक प्रचार मोहिमेचे नेते असलेले हरीश रावत नैनिताल जिल्ह्यातील लालकुआं मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
रवी टाले -
नैनिताल : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी कुमाऊं विभागातील २९ जागांसाठी विशेष जोर लावला. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उधमसिंग नगर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या रुद्रपूरमध्ये, तर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी खटीमा, हल्द्वानी आणि श्रीनगर येथे प्रचारसभांना संबोधित केले.
विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उधमसिंग नगर जिल्ह्यातील खटीमा मतदारसंघातून, तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या निवडणूक प्रचार मोहिमेचे नेते असलेले हरीश रावत नैनिताल जिल्ह्यातील लालकुआं मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसला कुमाऊं हा जुना बालेकिल्ला परत मिळवायचा आहे, तर भाजपपुढे गत निवडणुकीत त्या विभागातून मिळविलेल्या २४ जागांपैकी जास्तीत जास्त टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे परत घेऊनही, कुमाऊं विभागातील उधमसिंग नगर आणि नैनिताल या दोन जिल्ह्यांत भाजपला शेतकरी आंदोलनाची धग अजूनही जाणवत आहे. उत्तराखंडच्या दोन विभागांपैकी गढवालमध्ये ४१, तर कुमाऊंमध्ये २९ जागा असल्याने कोणताही सत्ताकांक्षी पक्ष एकाही विभागाकडे दुर्लक्ष करण्याचा धोका पत्करू शकत नाही. गढवालमध्ये चार धाम महामार्ग, ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पासह केंद्र सरकारचे इतरही काही प्रकल्प प्रगतीपथावर असल्याने, त्या विभागात भाजपची स्थिती कुमाऊंच्या तुलनेत उजवी आहे. बहुधा त्यामुळेच पंतप्रधान मोदींसह भाजपच्या स्टार प्रचारकांनी प्रारंभी गढवाल विभागात प्रचारसभा घेतल्या, तर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कुमाऊंवर लक्ष केंद्रित केले.
कुमाऊंमध्ये या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (खटीमा), माजी मुख्यमंत्री हरीश रावत (लालकुआं), काँग्रेसचे दलित नेता यशपाल आर्य (बाजपूर), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल (श्रीनगर), माजी मुख्यमंत्री के. सी. खंडुरी यांची कन्या रितू खंडुरी (कोटद्वार)