भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील NDA चा एक भाग असलेल्या मिझो नॅशनल फ्रंट (MNF) ने मणिपूर मुद्द्यावर सरकारच्या विरोधात आणि विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. आपण लोकसभेत मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांच्या अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देणार आहोत, असे भाजपसोबत मिझोराममध्ये सरकार चालवत असलेल्या एमएनएफने म्हटले आहे. यासंदर्भात गुरुवारी पीटीआयसोबत बोलताना, मणिपूरमधील जातीय हिंसाचार रोखण्यात केंद्र आणि राज्यातील सरकार अपयशी ठरल्याने आपम अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणार आहोत, असे MNF खासदार लालरोसांगा यांनी म्हटले आहे.
मणिपूर शेजारील राज्य असलेल्या मिजोरममधील सत्ताधारी MNF ने म्हटले आहे, विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला समर्थन म्हणजे, आम्ही काँग्रेससोबत आहोत अथवा भाजप विरोधात आहोत, असे नाही. मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेला हिंसाचार रोखण्यात केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील बीरेन सिंह सरकारला पूर्णपणे अपयश आल्याने, आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी आपण अविश्वास प्रस्तावासंदर्भात विरोधकांसोबत उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
एमएनएफ 2014 पासूनच एनडीएसोबत आहे आणि त्यांचे नेते जोरामथांगा हे मिजोरममध्ये मुख्यमंत्री म्हणून भाजपसोबत सरकार चालवत आहेत. याशिवाय, एनडीएमध्ये सामील होण्याबरोबरच, एमएनएफ इशान्येकडील राज्यांमध्ये भाजपच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सचा (NEDA) देखील सदस्य आहे.