मुंबई : यंदाच्या जेईई अॅडव्हान्स प्रवेश परीक्षेला सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. अभियांत्रिकी तसेच आयआयटीसाठीची ही प्रवेश परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली. रविवारी सकाळी ९ ते दु. १२ आणि दु. २ ते सायं. ५ अशा दोन सत्रात ही परीक्षा पार पडली.यंदाच्या प्रवेश परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी कानपूरकडे होती. एकूण १,६६,२०४ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन परीक्षा दिली. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही एकूण ५४ प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, पेपर-१ची गुणसंख्या मात्र १८३ वरून १८० करण्यात आली. आॅनलाइन पद्धतीने परीक्षेसाठी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात आली. पेपर-१साठी स. ७.३० तर पेपर-२ साठी दु. १२.४५ वाजताच विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. आॅनलाइन पद्धतीने परीक्षा पार पडल्याने उत्तराचा पर्याय बदलण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे प्रश्न कठीण असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. आज झालेल्या प्रवेश परीक्षेचे आदर्श उत्तरांची यादी २९ मे रोजी जेईईच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार आहे.अपेक्षेप्रमाणे यंदाची जेईई अॅडव्हान्स प्रवेश परीक्षा कठीण होती. अनेक विद्यार्थ्यांनी त्याबाबत निराशा व्यक्त केली आहे. नकारात्मक गुणपद्धतीच्या प्रश्नांची संख्या जास्त होती. त्यामुळे जास्त गुण मिळविणे अवघड जाणार आहे. एकूणच यंदाच्या जेईईचा कट आॅफ घसरण्याची शक्यता राव आयआयटीचे कार्यकारी संचालक विनय कुमार यांनी वर्तविली आहे.
दीड लाख विद्यार्थ्यांनी दिली जेईई अॅडव्हान्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:59 AM