नवी दिल्ली : दरवर्षी देशभरात पाच लाख रस्ते अपघातांमध्ये सुमारे दीड लाख लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत गुरुवारी दिली. मोठ्या संख्येतील अपघातांमुळे दरवर्षी ५५ हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असून ही रक्कम सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या(जीडीपी) तीन टक्के एवढी आहे.१२ व्या पंचवार्षिक योजनेत महामार्गांच्या विकासासाठी एकूण ४,८३,००० कोटी रुपयांची गरज असून सुमारे १,७८,००० कोटी रुपयांचा निधी खासगी गुंतवणुकीतून उभारण्याची योजना आहे. ९५ टक्के महामार्ग प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंबंधी प्रश्न सोडविण्यात आले असून लवकरच काम सुरू होईल. प्रलंबित पाच टक्के प्रकल्पांची कामेही सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनरेगाच्या रकमेचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हस्तांतरणपुढील वर्षी १ जानेवारीपासून मनरेगाच्या निधीचे हस्तांतरण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाईल. केरळमधून नव्या पद्धतीचा प्रारंभ केला जाणार आहे. योग्य लाभार्र्थींपर्यंत पैसा पोहोचविला जावा हा त्यामागचा उद्देश असल्याचे ग्रामीण विकास मंत्री वीरेंद्र सिंग यांनी सांगितले. मनरेगांतर्गत सुमारे ११ कोटी कामगारांच्या खात्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी ६५ टक्के खाती बँकांची तर उर्वरित पोस्ट खात्यांची आहेत. बनावट कामगार आणि नोंदणीकृत कामगारांच्या यादींचा गैरवापर टाळण्यासाठी ‘ई-मस्टर’ यंत्रणा आणण्यात आली आहे. यावर्षी १ एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक निधी व्यवस्थापन यंत्रणा लागू करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
रस्ते अपघातांत दरवर्षी दीड लाख लोकांचा मृत्यू
By admin | Published: December 04, 2015 2:55 AM