नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी माहिती व तंत्रज्ञान कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) देशातील १.५ लाख टपाल कार्यालयांच्या (इंडिया पोस्ट) आधुनिकीकरणासाठी इंटिग्रेटेड सोल्युशन तैनात केले आहे. २०१३ मध्ये टीसीएसने टपाल विभागाकडून १,१०० कोटी रुपयांचा अनेक वर्षे चालणारा करार माहिती व तंत्रज्ञान आधुनिकीकरणासाठी मिळवल्याचे जाहीर केले होते.हे आधुनिकीकरण टीसीएस इतर कोणत्याही कंपनीकडून सेवा न घेता झाले आहे. या भागीदारीचा हेतू पोस्टाला अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त करून ग्राहकांना कार्यक्षम सेवा देण्याचा आहे. या रूपांतरणात कोअर सिस्टीम इंटिग्रेशन कार्यक्रम टीसीएसने डिझाईन करून राबवला आहे. यात इंटिग्रेटेड ईआरपी सोल्युशन आहे. त्याद्वारे मेल ऑपरेशन्स, फायनान्स आणि अकाऊंटिंग, एचआर फंक्शन्स करता येतील व दीड लाखांपेक्षा जास्त संख्येत असलेल्या टपाल कार्यालयांना प्रचंड नेटवर्कशी जोडले गेले. यामुळे ही टपालसेवा सर्वात मोठी ई-पोस्टल नेटवर्क असलेली बनेल, असे टीसीएसने निवेदनात म्हटले.टीसीएसने म्हटले आहे की, आम्ही आमच्या पॉइंट ऑफ सोल्युशनची (पीओएस) अंमलबजावणी २४ हजार टपाल कार्यालयांत ८० हजार पीओएस टर्मिनलने केली असून, कन्साईनमेंट ट्रॅकिंग कॅपॅबिलिटीजने वेब पोर्टलही तसेच मल्टी लिंग्वल कॉल सेंटर ग्राहकांसाठी उभारले आहेत. या रूपांतरणाचा महत्त्वाचा हेतू हा देशभर पसरलेल्या टपाल कार्यालयाचा उपयोग आर्थिक व्यवहारात लोकांना सामावून घेणे आणि अतिशय दूरच्या भागांत सेवा पोहोचवण्याचा आहे. हे काम १.३ लाख दर्पण १ उपकरणाद्वारे केले जाईल. हे उपकरण हातात मावणारे असून, ग्रामीण डाक सेवक ते टपाल, बँकिंग, विमा सेवा आणि अत्यंत दूरवरील खेड्यांत रोख देण्यासाठी करतील व यासाठी नेटवर्क कनेक्टिव्हिटीची गरज नसेल, असे टीसीएसने म्हटले.इंटिग्रेटेड सोल्युशनला पाच लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची गरज आहे, एकाच वेळी ४० हजार वापरकर्त्यांना सेवा मिळतील आणि तीन दशलक्ष टपाल व्यवहारांची प्रक्रिया केली जाईल व त्याद्वारे ही जगातील एक मोठी सॅप (एसएपी) राबवणारी ठरेल, असेही त्यात म्हटले आहे.
दीड लाख टपाल कार्यालये टीसीएसने केली आधुनिक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 2:54 AM