नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर लोकांना रोखरहित डिजिटल व्यवहार प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या बक्षिस योजनेचे एक कोटी रुपयांचे बंपर बक्षिस रविवारी सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या ग्राहकास जाहीर झाले. या ग्राहकाने रुपे डेबिट कार्ड वापरून १,५९० रुपयांचा व्यवहार केला होता.सरकारने ग्राहकांसाठी भाग्यवंत ग्राहक योजना व व्यापाऱ्यांसाठी डिजी धन व्यापार योजना अशा दोन योजना सुरु केल्या होत्या. या दोन्ही योजनांची बंपर बक्षिसांची सोडत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते काढण्यात आली.या सोडतीत राष्ट्रपतींनी या दोन्ही योजनांचे प्रत्येकी तीन विजेते ठरविण्यासाठी चिठ्ठ्या काढल्या. येत्या १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीस नागपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण केले जाईल. भाग्यवंत ग्राहक योजनेचे एक कोटी रुपयांचे पहिले बक्षिस सेंट्रल बँकेच्या, ५० लाख रुपयांचे दुसरे बक्षिस बँक आॅफ इंडियाच्या ग्राहकास तर २५ लाख रुपयांचे तिसरे बक्षिस पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकास मिळाले. या तिन्ही ग्राहकांनी रुपे डेबिट कार्ड वापरून रोखरहित व्यवहार केले होते. ही सोडत काढण्यासाठी फक्त व्यवहार क्रमांक घेण्यात आल्याने या विजेत्या ग्राहकांची नावे लगेच कळू शकली नाहीत. व्यवहार क्रमांकांची कार्ड क्रमांकाशी जुळणी करून ग्राहकांची नेमकी ओळख स्पष्ट होईल.पारदर्शी चळवळ...डिजिटल व्यवहारांची संस्कृती रुजविण्यासाठी सरकारने उचललेले हे धाडसी पाऊल प्रशंसनीय आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांनी यात सक्रियपणे सहभागी होऊन ही चळवळ यशस्वी करायला हवी. पारदर्शी व्यवहारांसाठी हे गरजेचे आहे.-प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती
दीड हजाराचा व्यवहार,बक्षीस मिळाले कोटीचे
By admin | Published: April 10, 2017 1:02 AM