श्रीनगर - भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. यानंतर झालेल्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे. हरी वाकेर असं या जवानाचं नाव असून ते गंभीर जखमी झाले होते. वाकेर यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा रविवारी (24 मार्च) मृत्यू झाला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (22 मार्च) चकमक सुरू झाली होती. या चकमकीत सुरक्षा यंत्रणांनी सडेतोड उत्तर देत 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत गेल्या 24 तासांत 7 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. उत्तर काश्मीरच्या सोपोरमध्ये दोन दिवसांपूर्वी रफियाबाद याठिकाणी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. सुरक्षा यंत्रणाचे या परिसरात शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला होता. या ग्रेनेड हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी हानी झाली नव्हती मात्र 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. मागील 4 दिवसांपासून या परिसरात सुरक्षा यंत्रणांची शोधमोहीम सुरु आहे. दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरू आहे.
आई-वडिलांच्या आर्त विनवणीनंतरही दहशतवाद्यांनी मुलाला ठार केलं
जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचे क्रुर कृत्य पुन्हा एकदा समोर आलेले आहे. काश्मीरच्या शोपिया, बांदीपोरा आणि सोपोरमध्ये या भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये अनेक दिवसांपासून चकमकी होत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी क्रुर कृत्य केलं. 12 वर्षाच्या मुलाला ओलीस ठेवून दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली. त्या मुलाच्या आई-वडिलांनी आर्त विनवणी करत आपल्या मुलाची सुटका करावी अशी हात दहशतवाद्यांना देत होते. मात्र आई-वडिलांच्या विनवणीनंतरही दहशतवाद्यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. अखेर त्या मुलाची दहशतवाद्यांनी हत्या केली. बांदीपोरा जिल्ह्यातील मीर मोहल्ला येथे 2 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. याच दहशतवाद्यांनी मुलाला ओलीस ठेवले होते. तर आणखी एका ओलीस ठेवलेल्या नागरिकाला सोडविण्यात पोलिसांना यश आलं. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या एका कमांडरचाही समावेश आहे. शोपिया जिल्ह्यातील इमाम साहिब भागात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताने LoC वर रोखला व्यापार
पाकिस्तानकडून वारंवार होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन अद्यापही सुरुच आहे. पाकिस्ताने याआधी पुंछ परिसरात शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ मोठ्याप्रमाणात गोळीबार करण्यात आला. यामुळे स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले होते. पाकिस्तानच्या या नापाक हरकतीला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. नियंत्रण रेषेवरील (एलओसी) ट्रेड सेंटरवरच पाकिस्तानने शेल्सचा मारा केल्याने एलओसीवरील भारत-पाकिस्तान दरम्यानचा व्यापार बंद करण्यात आला होता. याआधी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील व्यापार बंद करण्यात आला होता.