केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी सोमवारी एकाला अटक करण्यात आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी एक्सवर लिहिले आहे की, आसाम पोलिसांनी रितोम सिंह नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने अमित शाह यांचा आरक्षणासंदर्भात तयार केलेला एडिटेल (फेक) व्हिडिओ शेअर केला होता.
यापूर्वी, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात एक एफआयआर दाखल केली होती. तसेच, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना नोटिसही बजावली होती. याच बरोबर, त्यांना आपली बाजू मांडण्यासाठीही बोलावले होते. तसेच फोनही सोबत ठेवण्यास सांगितले होते.
असा होता एडिटेड व्हिडिओ -खरे तर, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचा एक एडिटेड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, अमित शाह एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण संपुष्ट आणण्यासंदर्भात बोलत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, पीटीआयच्या फॅक्ट चेकमध्ये हा दावा फेक सिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आला आहे.
काय म्हणाले होते अमित शाह -अमित शाह गेल्या काही दिवसांपूर्वी एका प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी तेलंगणामध्ये गेले होते. येथे काँग्रेसवर निशाणा साधताना शाह म्हणाले होते, भाजपचे सरकार आल्यास, बेकायदेशीर मुस्लीम आरक्षण नष्ट केले जाईल. तेलंगानातील एससी-एसटी आणि ओबीसींचा हा अधिकार आहे, जो त्यांना मिळणारच.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हा एडिटेड व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओ संदर्भात भाजप आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने तक्रार केली होती. यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले होते.