बाहुबली २ मध्ये एकाच वेळी तीन बाण कसे सोडायचे हे बाहुबलीच्या रुपातील प्रभास सांगत असलेला सीन तुम्ही पाहिला असेल. नादवे मणिबन्धम् बहिर्मुखम्... धनुर्धारी विद्येत हे असेलही, परंतू त्याच्याही पुढे जात डीआरडीओने एक मोठी कमाल केली आहे. एकाच मिसाईलने हवेत चार वेगवेगळी लक्ष्य भेदली आहेत. डीआरडीओने सर्वात घातक किंझल मिसाईललाही लाजवेल असे मिसाईल आपल्या सैन्यासाठी तयार केले आहे. हा कारनामा पाहून पाकिस्तान, चिन्यांच्या छातीत धडकी भरली असेल.
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि भारतीय लष्कराने मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची (MRSAM) यशस्वी चाचणी घेतली. आतापर्यंत या मिसाईलच्या चार लष्करी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. चारही चाचण्या अत्यंत अचूक होत्या आणि त्यांचे लक्ष्य नष्ट करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. ओडिशाच्या किनाऱ्यावरील बंगालच्या उपसागरात असलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर गेले दोन दिवस या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
एक मिसाईल अत्युच्च वेगात येणाऱ्या टार्गेटवर डागण्यात आले होते. या मिसाईलने या वेगवान टार्गेटचाही अचूक वेध घेतला. एकावेळी चार टार्गेट भेदण्यात हे मिसाईल यशस्वी ठरले. लांब पल्ल्याचे, कमी पल्ल्याचे, जास्त उंचीचे आणि कमी उंचीचे चार लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. या मिसाईलच्या कार्यक्षमतेवर चांदीपूर येथील तैनात केलेल्या रडार आणि इन्फ्रारेड ट्रॅकिंग सिस्टमसारख्या उपकरणांद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय लष्कर आणि संरक्षण उद्योगांचे अभिनंदन केले. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष समीर व्ही. कामत यांनीही यशस्वी उड्डाण चाचणीत सहभागी टीमचे अभिनंदन केले आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये बहु-कार्यात्मक रडार असून कमांड पोस्ट, मोबाइल लाँचर सिस्टम आणि इतर वाहनांमधूनही लाँच केले जाऊ शकते.