Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील कन्नौजमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. ट्रॅफिक पोलिस निरीक्षकाने महामार्गावर एक ऑटो थांबवून तपासणी केली असता ते चक्रावून गेले. कारण, ऑटोमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी बसले होते. निरीक्षकांनी प्रवाशांची मोजणी सुरू केली तेव्हा त्यांना कळले की, ऑटोमध्ये चालकासह चक्क 16 जण होते. विशेष म्हणजे, ऑटोचालक स्वतः अपंग होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कन्नौजमध्ये वाहतूक पोलिसांकडून वाहतूक महिना सुरू आहे. यावेळी नियमाविरुद्ध वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याच अनुषंगाने तिरवा रस्त्यावर वाहतूक निरीक्षकांकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत होती. तेवढ्यात इन्स्पेक्टरची नजर एका ऑटोवर पडली. ऑटो थांबवून आत तपासले असता ते दृश्य पाहून थक्क झाले.
या ऑटोमध्ये चालकासह 16 जण बसले होते. चालकाची चौकशी केली असता, तो अपंग असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी ऑटो चालकाला खाली उतरवून कडक ताकीद दिली. यावेळी चालकाने हात जोडून माफी मागायला सुरुवात केली. सरतेशेवटी इन्स्पेक्टरने ऑटोचे चालान केले आणि अशी चूक पुन्हा करू नये, अशा कडक सूचना चालकाला दिल्या.