सूरत: देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसतंय. गुजरातच्या सूरतमध्ये एका ६९ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. याशिवाय बडोद्याच्या एका रुग्णालयात ६५ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झालाय. मात्र या महिलेच्या कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. गुजरातच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिलीय. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सूरतमध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्या ज्येष्ठ नागरिकाला अनेक गंभीर आजार होते. याशिवाय बडोद्याच्या रुग्णालयात मृत पावलेली महिलादेखील अनेक गंभीर आजारांचा सामना करत होती. गुजरातमध्ये कोरोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद झालीय. तर देशभरातील कोरोनाच्या मृतांचा आकडा सातवर पोहोचलाय. कोरोनामुळे आतापर्यंत महाराष्ट्रात २ तर दिल्ली, बिहार, कर्नाटक, पंजाब आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ७५ रुग्ण आढळून आले आहेत. गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. त्यामुळे अहमदाबाद, सूरत, बडोदा, राजकोट २५ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय गुजरात सरकारनं घेतलाय. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाच्या शहरांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.