मंदसौर (मध्य प्रदेश) : पोलिस गोळीबारात ठार झालेल्या पाच शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी भेट घेऊन त्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा धनादेश दिला. मंदसौर येथे आंदोलनात आधी पाच शेतकऱ्यांचा गोळीबारात तर एकाचा पोलसांच्या लाठीमारात मृत्यू झाला होता. चौहान विमानाने मंदसौर येथे पोहोचले. त्यांनी बदवान खेड्यात जाऊन पोलिस गोळीबारातील मृत घनश्याम धाकड यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. पाचपैकी एक शेतकरी पोलिसांच्या मारहाणीत जखमी झाला होता त्याचा नंतर मृत्यू झाला. शेतकऱ्यांच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन चौहान यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिले. मृत शेतकरी चैनरामचे वडील गणपत यांनी मागणी केल्यावर चौहान यांनी कुचलोड ते नयाखेडा दरम्यान डांबरी रस्ता, समाज केंद्र आणि शेतकऱ्याच्या स्मरणार्थ स्मारक मंजूर केले. नुकसान भरपाईची ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जिल्हा प्रशासनाने सुरक्षेचा मोठा बंदोबस्त ठेवला होता. पाच हेलिपॅड्स वेगवेगळ््या ठिकाणी तयार केले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी शेतकरी हत्यांच्या निषेधार्थ भोपाळमधील दसरा मैदानावर सत्याग्रह सुरू केला आहे. शिंदे यांना प्रशासनाने मंगळवारी मंदसौर येथे जाण्यास प्रतिबंध केला होता.
मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी
By admin | Published: June 15, 2017 12:58 AM