लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या एका सहकाऱ्याकडून संचलित कंपनीला एका मद्य व्यावसायिकाने कथितरीत्या एक कोटी रुपये दिले, असा दावा सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात केला आहे. केंद्रीय एजन्सीने दाखल गुन्ह्यात १५ लोकांची नावे घेतली आहेत. सिसोदिया यांच्याशिवाय आरोपी म्हणून तत्कालीन उत्पादन शुल्क आयुक्त आरव गोपी कृष्ण, तत्कालीन उपायुक्त आनंद कुमार तिवारी, सहायक आयुक्त पंकज भटनागर, नऊ व्यावसायिक आणि दोन कंपन्या यांची नावे आहेत.
मनोरंजन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ओन्ली मच लाउडरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नायर, ब्रिंडको स्पिरिटसचे मालक अमनदीप ढल आणि इंडोस्पिरिटसचे मालक समीर महेंद्रू इत्यादी उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनियमिततेत सहभागी होते.
आपच्या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर सीबीआयने धाडी टाकल्यानंतर आपच्या समर्थकांनी शुक्रवारी निदर्शने केली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मथुरा रोडवरील सिसोदिया यांच्या निवासस्थानाजवळ या समर्थकांनी निदर्शने केली. या निदर्शकांना ताब्यात घेऊन वसंत कुंज पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
मनी लाँड्रिंग प्रकरणातही चौकशी?
आप सरकारकडून उत्पादन शुल्क धोरण तयार करणे आणि ते लागू करणे या प्रकरणात ईडी मनी लाँड्रिंगचा तपास करू शकते. सूत्रांनी सांगितले की, एजन्सीकडून औपचारिक प्रकरण दाखल करण्यापूर्वी सीबीआयच्या प्रकरणाची माहिती, विविध सरकारी अधिकारी आणि अन्य व्यक्तींचा संबंध याचा तपास केला जाऊ शकतो.