नवी दिल्ली - देशात 1993-94 नंतर पहिल्यांदाच बेरोजगारीचा मोठा सामना करावा लागला आहे. सन 2013 ते 2018 या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात देशातील 4 कोटी रोजगार गेले आहेत. भारत सरकारच्या सांख्यिकी विभागाअंतर्गत येणाऱ्या NSSO (National Sample Survey Office) ने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. सन 2017-18 मध्ये देशाला सर्वाधिक बेरोजगारीचा फटका बसल्याचेही या सर्वेक्षणातून जाहीर करण्यात आले आहे. यावरुन राहुल गांधींनी पतंप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षी देशातील 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन 2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी दिले होते. मात्र, एनएसएसओच्या सर्वेक्षणानुसार अगदी याउलट घडल्याचे दिसून येते. या आकडेवाडीवरुन देशात गेल्या 5 वर्षात 2 कोटी रोजगार बुडाले आहेत. सन 2017-18 मध्ये पुरुष कामगारांची संख्या 28 कोटी 60 लाखांवर येऊन पोहोली आहे. विशेष म्हणजे सन 1993-94 मध्ये पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या 21.9 कोटी एवढी होती. तर 2011-12 मध्ये पुरुष कर्मचाऱ्यांची ही संख्या 30 कोटी 40 लाख एवढी झाली. तसेच 2011-12 पासून आतापर्यंत एकूण 4 कोटी 70 लाख रोजगार कमी झाले आहेत. या अहवालात शहरी आणि ग्रामीण भागातील बेरोजगारीचीही आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार, शहरी भागात बेरोजगारीची दर 7.1 टक्के तर ग्रामीण भागात 5.8 टक्के एवढा हा दर राहिला आहे.
दरम्यान, एनएसएसओच्या या सर्वेक्षणानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. सन 2018 मध्ये देशात दिवसाला 27 हजार रोजगार बुडाल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे. मला वाटलं होतं की, देशात दिवसाला 450 रोजगार निर्माण होत आहेत. मात्र, मोदींच्या धोरणामुळे 2018 या एका वर्षात 1 कोटी रोजगार बुडाल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.