पाटणा: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी शनिवारी लाेकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात देशभरातील एक कोटी बेरोजगार तरुणांना सरकारी नोकऱ्या आणि राखीपौर्णिमेच्या दिवशी गरीब कुटुंबातील भगिनींना दरवर्षी एक लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्यास ही आश्वासने पूर्ण करण्यात येतील, असे ते म्हणाले. ‘राजद’ने आपल्या जाहीरनाम्याला ‘परिवर्तन पत्र’ असे नाव दिले आहे. त्यात जनतेला एकूण २४ आश्वासने देण्यात आली आहेत.
‘आज जी काही आश्वासने दिली, ती निश्चितपणे पूर्ण केली जातील. २०२०च्या बिहार विधानसभा निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने आम्ही आमच्या कार्यकाळात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही ५ लाख सरकारी नोकऱ्यांची व्यवस्था केली; तसेच जातिनिहाय जनगणनेसह आरक्षण मर्यादा ७५ टक्के केली, असे ते म्हणाले.
दिली काेणकाेणती आश्वासने?
- देशभरातील एक कोटी बेरोजगार तरुणांना सरकारी नोकऱ्या.
- राखी पौर्णिमेपासून गरीब कुटुंबातील महिलांना वार्षिक १ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य.
- सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करू.
- एलपीजी सिलिंडर ५०० रुपयांना देऊ.
- बिहारला विशेष दर्जासह सर्वांगीण विकासासाठी पुढील पाच वर्षांत १ लाख ६० हजार कोटी रुपयांचे पॅकेज देणार.
- बिहारच्या धर्तीवर देशभरात जात जनगणनेसह आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करणार.
- कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या निमलष्करातील जवानाला हुतात्मा दर्जा.
- ज्येष्ठांसह इतरांना पूर्वी असलेली रेल्वे भाड्यातील सवलत पुन्हा सुरू करणार.