चेन्नई : तमिळ सुपरस्टार रजनीकांत आज पुन्हा एकदा चर्चेत आले. निमित्त होते शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची घेतलेली भेट. यावेळी त्यांनी नदी जोड प्रकल्पाचे समर्थन करत एक कोटी रुपये मदत देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा नव्याने रंगली आहे. रजनीकांत यांनी रविवारी पी. अय्याकन्नू यांच्या नेतृत्वातील १६ शेतकरी प्रतिनिधींची भेट घेतली. ‘युद्धासाठी तयार रहा’, असे आवाहन रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. त्यानंतर आज शेतकऱ्यांशी बोलताना रजनीकांत यांनी सांगितले की, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात येईल. तर, या योजनेसाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. काही आठवड्यांपूर्वीच रजनीकांत यांनी संकेत दिले होते की, ते राजकारणात प्रवेशाबाबत विचार करत आहेत. याबाबत बोलताना शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे अय्याकन्नू यांनी सांगितले की, नदी जोड प्रकल्पासाठी पुढाकार घेण्याचा शब्द रजनीकांत यांनी दिला आहे. सर्वप्रथम महानदी, गोदावरी, कृृष्णा, पालारु आणि कावेरी यासारख्या नद्या जोडणे आवश्यक असल्याचे मत रजनीकांत यांनी व्यक्त केले. रजनीकांत यांनी २००२ मध्ये कावेरी मुद्यावरील उपोषणाच्या दरम्यान नदी जोडण्यासाठी एक कोटी रुपये देऊ केले होते. दरम्यान, अय्याकन्नू यांनी सांगितले की, रजनीकांत यांनी या योजनेसाठी तत्काळ एक कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण, ही रक्कम पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्याकडे देण्यात यावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली.
नदी जोडणीसाठी रजनीकांत यांचे एक कोटी
By admin | Published: June 19, 2017 1:11 AM