माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावरून तृणमुलच्या नेत्या आणि माजी खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपावर खोचक टीका केली आहे. एके दिवशी भाजप मलाही प्रवेश देण्याचा विचार करेल, असे महुआ यांनी म्हटले आहे. यावरून राजकीय वादंग सुरु झाला आहे.
महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत शिस्तभंगावरून कारवाई करण्यात आली आहे. महुआ यांनी उद्योगपतीसोबत संसदेच्या अकाऊंटचा पासवर्ड शेअर केला होता. या प्रकरणात महुआ दोषी आढळल्या होत्या. यामुळे मोईत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.
यावरून आता महुआ यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. महुआ यांनी ट्वीटमध्ये राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचाही उल्लेख केला आहे. भाजपा ज्या प्रकारे नेत्यांना प्रवेश देत आहे, याच नेत्यांना ते कधी काळी भ्रष्टाचारी म्हणत होते. अशाच प्रकारे एक दिवस मी देखील भाजपात सहभागी व्हावे असे त्यांना वाटेल. हा त्यांचा घसरणारा स्तर आहे, असे महुआ यांनी म्हटले आहे.
रामललाच्या कृपेने जर २०२४ मध्ये भाजपाच्या ४०० जागा येणार असतील तर ते प्रत्येक नेत्याला भाजपात आणण्यास का एवढे उतावीळ का झालेत? ज्या नेत्यांना भ्रष्ट ठरविले होते त्यांना आपल्यासोबत का घेत आहेत, असा सवाल महुआ यांनी उपस्थित केला आहे.