नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेतील 11,300 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीने कर्मचाऱ्यांना उद्देशून पत्र लिहीले आहे. गितांजली जेम्सचा मालक मेहुल चोकसीने स्वत:वरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी काहीही चुकीचे केलेले नाही. एकदिवस सत्याचा विजय होईल असे त्याने म्हटले आहे. जे माझ्या नशिबात लिहीले आहे त्याचा सामना करण्यासा मी तयार आहे. पण मी काहीही चुकीचे केलेले नाही. एकदिवस सत्याचा विजय होईल असे चोकसीने या पत्रात म्हटले आहे.
त्याचे वकिल संजय अबोट यांनी हे पत्र जारी केले आहे. तपास यंत्रणांनी बँकेतील खाती गोठवून मालमत्ता जप्त केल्यामुळे 3500 कर्मचाऱ्यांची देणी आपण चुकवू शकलेलो नाही. त्याबद्दल चोक्सीने पत्रामध्ये खंत व्यक्त केली आहे. तपास यंत्रणा ज्या पद्धतीने माझ्या व्यवसायावर तुटून पडल्या आहेत त्यामुळे मला अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे असे चोकसीने पत्रात म्हटले आहे.
माझ्या कंपनीबद्दल भितीदायक आणि अन्यायकारक वातावरण तयार करण्यात आल्याचा उलटा आरोप त्याने केला. व्यवसाय ठप्प झाल्यामुळे त्याने कर्मचाऱ्यांना दुसऱ्या ठिकाणी नोकरी शोधण्याचा सल्ला दिला आहे. कर्मचाऱ्यांना कंपनीकडून जे लॅपटॉप आणि मोबाइल फोन देण्यात आले होते. ते सर्व देणी चुकवून होईपर्यंत कर्मचाऱ्यांकडेच राहतील तसेच अनुभव प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले जाईल असे चोकसीने या पत्रात म्हटले आहे.
पीएनबी घोटाळाप्रकरणी गीतांजलीचा मेहुल चोकसी याची हैदराबादच्या एसईझेडमधील १२०० कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. याशिवाय चोकसी व नीरव मोदीच्या ९४.५२ कोटींच्या म्युच्युअल फंड्स व शेअर्सवरही ईडीने टाच आणली आहे.
ईडीने नीरव मोदीच्या ९ लक्झरी कारही जप्त केल्या आहेत. यातील ८६.७२ कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड्स व शेअर चोकसीचे तर उरलेले मोदीचे आहेत. मोदीच्या रोल्सराइस घोस्ट, मर्सिडीज बेंझ, पोर्शे पनामेरा, होंडा, टोयोटा फॉर्च्युनर व इनोव्हा या कार जप्त केल्या आहेत.