ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - देशातील अनेक भागात दारुबंदीची मागणी वाढत चालली आहे. दारुमुळे व्यक्ती आणि समाजावर होणा-या विपरीत परिणामांची एक नवी धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. दारुमुळे दरदिवशी पंधरा भारतीयांचा मृत्यू होतो किंवा दर ९६ मिनिटाला एक भारतीय दारुच्या व्यसनामुळे मृत्यूमुखी पडतो.
राष्ट्रीय गुन्हे नोंद केंद्राच्या इंडिया स्पेंड २०१३ च्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. भारतात दारु पिण्याचे प्रमाण ३८ टक्क्यांनी वाढले आहे. २००३-०५ मध्ये जे प्रमाण १.६ टक्के होते ते आता २.२ टक्के झाले आहे. दारुबंदीला राजकीय पाठिंबा वाढत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जे. जयललिया यांनी २३ मे रोजी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यादिवशीच त्यांनी ५०० मद्याची दुकाने बंद करण्याची घोषणा केली. एक एप्रिलपासून संपूर्ण बिहारमध्ये दारुबंदी लागू झाली. ऑगस्ट २०१४ मध्ये केरळ सरकारनेही सर्रास चालणा-या दारुविक्रीवर काही निर्बंध आणले.
एनसीआरबीच्या अहवालानुसार मद्यपानामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्यानंतर मध्यप्रदेश आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. अति मद्यपानाचा गुन्हेगारीशी संबंध जोडला जातो असे तज्ञांनी सांगितले. मद्यपानामुळे गुन्हे, अपघात, लैंगिक जबरदस्ती यासारखे गुन्हे वाढतात.
केरळमध्ये ६९ टक्के गुन्हे मद्यपानामुळे झाले आहेत. २०१५ मध्ये मुंबईत मालवणीमध्ये विषारी दारु प्याल्यामुळे १०० हून अधिक मृत्यू झाले होते. २०१४ मध्ये १६९९ जणांचा विषारी दारु प्याल्यामुळे मृत्यू झाला. २०१३ मध्ये ३८७ जण विषारी दारुपिऊन मृत्यूमुखी पडले होते.