मध्य प्रदेशात आठ वर्षीय बालकाचा भूूकबळी, कुटुंबाची उपासमार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 04:59 AM2019-10-02T04:59:38+5:302019-10-02T05:00:00+5:30
भुकेने व्याकूळ झालेल्या आठ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यात सोमवारी घडली.
बडवानी : भुकेने व्याकूळ झालेल्या आठ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यात सोमवारी घडली. गेल्या काही दिवसांपासून अन्नाचा कणही पोटात न गेल्याने या दुर्दैवी बालकाच्या कुटुंबातील अन्य पाच जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. कृषिप्रधान भारतात अन्नावाचून बालकांचा मृत्यू व्हावा, ही बाब लाजिरवाणी आहे.
रतन कुमारच्या कुटुंबियांच्या हालअपेष्टा आणि व्यथा हृदयाला पाझर फोडणारी आहे. या अभागी कुटुंबियांच्या नातेवाईकांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून रतन कुमारच्या कुटुंबियांनी काहीही खाल्लेले नाही. या कुटुंबाकडे शिधापत्रिका (रेशन कार्ड) नसल्याने त्यांना दरमहा स्वस्तदर धान्य दुकानातून स्वस्तातील धान्यही घेता येत नाही. काही गावकरीच आपापल्यापरीने त्यांची भूक भागवून त्यांना मदत करतात.
रोजंदारीवर काम करणाऱ्या या कुटुंबाला सरकारच्या कोणत्याही कल्याणकारी योजनेचा लाभ मिळत नाही, असे एका नातेवाईकाने सांगितले. पोटात अन्नाचा कण नसल्याचे उलट्या आणि अतिसार होत असल्याने रतन कुमारच्या कुटुंबियांतील पाच जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. आम्ही गेल्या काही दिवसांपासून काहीही खाल्लेले नाही, असे या कुटुंबियांनी सांगितल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सुनील पटेल यांनी दिली.
त्यांच्या अवस्था बघता गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अन्नच ग्रहण केले नसल्याचे प्रथम सकृत्दर्शनी दिसते, असे उपविभागीय दंडाधिकारी अंशू ज्वाला म्हणाल्या. याप्रकरणी अधिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कुटुंबियांना सरकारच्या कल्याणकारी योजनांचे लाभ मिळवून दिले जातील. त्यांना लाभांपासून वंचित ठेवणाºया दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी हमीही त्यांनी दिली.