नवी दिल्ली: केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना पदावरुन तडकाफडकी हटवण्यात आलं आहे. आता कायदा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या या निर्णयावरुन विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच विरोधकांकडूनही विविध सवाल उपस्थित करण्यात येत आहे. ज्येष्ठ वकील आणि राजकारणी कपिल सिब्बल यांनी या फेरबदलावर टोला लगावला आहे. कपिल सिब्बल ट्विट करत म्हणाले की, कायदा नव्हे, आता पृथ्वी विज्ञान मंत्री. कायद्यांमागील विज्ञान समजून घेणं सोपं नाही. आता विज्ञानाचे नियम समजून घेण्याचा प्रयत्न करावे लागतील. शुभेच्छा मित्रा, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे. कपिल सिब्बल यांनी देशभरात चर्चेत असणारा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला ठाकरे गटाकडून लढवला होता.
दरम्यान, किरेन रिजिजू हे अरुणाचल पश्चिम लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे खासदार आहेत. किरेन रिजिजू यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९७१ रोजी अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. त्यांनी २००४ मध्ये (अरुणाचल पश्चिम मतदारसंघ) पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली. पण २००९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०१४च्या निवडणुकीत रिजिजू पुन्हा विजयी झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना गृहराज्यमंत्री बनवण्यात आले. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात म्हणजेच २०१९मध्ये त्यांना क्रीडा मंत्री (स्वतंत्र प्रभार) बनवण्यात आले. जुलै २०२१मध्ये, त्यांना मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान कायदा मंत्री करण्यात आले. रविशंकर प्रसाद यांच्या जागी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती.
कोण आहे अर्जुन राम मेघवाल?
अर्जुन राम मेघवाल हे २००९पासून बिकानेरचे खासदार आहेत. मेघवाल यांचा जन्म बिकानेरच्या किसमिदेसर गावात झाला. बिकानेरच्या डुंगर कॉलेजमधून बीए आणि एलएलबी केले. यानंतर त्यांनी त्याच महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी (M.A) केली. यानंतर त्यांनी फिलिपाइन्स विद्यापीठातून एमबीएही केले. ते राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत आणि राजस्थानमधील अनुसूचित जातीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मेघवाल २००९, २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत बिकानेरमधून भाजपच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले होते. २०१३मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ते लोकसभेतील भारतीय जनता पक्षाचे मुख्य व्हीप होते. मे २०१९मध्ये मेघवाल संसदीय कामकाज आणि अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री बनले. आता त्यांच्याकडे कायदा मंत्रालयाची जबाबदारीही देण्यात आली आहे.