नवी दिल्ली : निवडणुकीत मतदान यंत्रणातील (ईव्हीएम) मतांच्या मोजणीसोबत व्हीव्हीपॅटशी शंभर टक्के जुळवणी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे, तसेच निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना हस्तक्षेप करणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.निवडणूक प्रक्रिया चालू असता मध्येच आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रमिणयम यांच्या न्यायपीठाने म्हटले आहे.पश्चिम बंगालसह पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होत असून, २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. याचिकाकर्ते गोपाल सेठ यांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलाला न्यायपीठाने विचारणा केली की, यासंदर्भात आपण निवडणूक आयोगाला निवदेन दिले आहे का? या वकिलाने सांगितले की, निवडणूक आयोगाने आमच्या निवदेनाची प्रशंसा केली होती. मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक जनतेचा अधिकार आहे, असेही आयोगाने म्हटले होते.या मुद्यावर याचिकर्त्याने कोलकाता उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने यावर पूर्वीच आदेश दिला होता, असे वकिलाने उच्च न्यायालयात सांगितले होते.
निष्पक्षपणावर संशय नाहीसर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले की, विशेष विनंती याचिका फेटाळली जात आहे. २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, सध्याच्या निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षपणावर आम्ही संशय घेत नाही. ही निवडणूकप्रणाली अचूक निकालाची खात्री देते.