सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. यापैकी त्रिपुराच्या धनपुरमध्ये भाजपाने खाते उघडले आहे. अन्य दोन मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत, परंतू उत्तर प्रदेशच्या घोसीमध्ये भाजपाला सपाटून मार खावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उत्तराखंडमधील बागेश्वर, उत्तर प्रदेशातील घोसी, केरळमधील पुथुपल्ली, पश्चिम बंगालमधील धुपगुरी, झारखंडमधील डुमरी आणि त्रिपुरातील बॉक्सनगर आणि धनपूर या जागांवर पोटनिवडणूक झाली आहे.
धनपूरमध्ये भाजपच्या बिंदू देबनाथ यांना 30017 तर माकपच्या कौशिक चंदा यांना 11146 मते मिळाली. भाजपला 18871 मतांच्या फरकाने ही जागा जिंकता आली आहे. उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये सहाव्या फेरीत भाजप 1700 मतांनी पुढे आहे. पार्वती दास यांना 15253 मते मिळाली आहेत तर काँग्रेसच्या बसंत कुमार 13553 मते मिळाली आहेत. इथे कांटे की टक्कर पहायला मिळत आहे.
त्रिपुरातील आणखी एक जागा भाजपाच्या पारड्यात जाताना दिसत आहे. बॉक्सानगर भाजपचे तफज्जल हुसेन 25478 मतांनी आघाडीवर आहेत. सीपीआय(एम)चे मिजान हुसेन यांना फक्त २२७३ मते मिळाली आहेत.
घोसीमध्ये सपाचा उमेदवार मोठी आघाडी घेत आहे. सहाव्या फेरीनंतर सपा 8557 मतांनी आघाडीवर आहे. सपा उमेदवार सुधाकर सिंह यांना 22785 तर भाजपचे दारा सिंह चौहान यांना 14228 मते मिळाली आहेत.
पश्चिम बंगालच्या धुपगुरीमध्ये टीएमसी आघाडीवर असली तरी हे अंतर खूपच कमी आहे. तीन फेऱ्यांनंतर तृणमूलला 11739 मते मिळाली आहेत. तर भाजप 10620 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीएमसीकडे 1119 मतांची आघाडी आहे.
केरळच्या पुथुपल्लीमध्ये काँग्रेस 16864 मतांनी आघाडीवर आहे. सहाव्या फेरींनंतरही सीपीआय(एम)चे जॅक सी थॉमस दुसऱ्या क्रमांकावर आहेत. झारखंडच्या डुमरीमध्ये NDA समर्थित AJSU पक्षाच्या उमेदवार यशोदा देवी या 1341 मतांनी मागे पडल्या आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाच्या बेबी देवी या आघाडीवर आहेत. परंतू तिथेही पारडे पालटू शकेल अशी स्थिती आहे.