ऑनलाइन टीम
श्रीनगर, दि. १३ - देशाचे नवे संरक्षणमंत्री अरूण जेटली यांच्या शुक्रवारी होणा-या काश्मीर दौ-याच्या पार्श्वभूमीवर
भारत-पाक नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात १ जवान शहीद झाला आहे. शुक्रवारी सकाळी पूँछ जिल्ह्यातील बालकोट भागात नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार तसेच ग्रेनेडच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून तीन जण जखमी झाल्याचे समजते.
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून जेटली यांचा काश्मीर दौरा व आज झालेला गोळीबार याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. संरक्षण मंत्री काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी प्रथमच काश्मीरमध्ये येत असताना अशा पद्धतीने सीमेपलीकडून झालेला हल्ला हा निव्वळ योगायोग आहे का?असा सवाल अब्दुल्ला यांनी केला आहे.