बिदर (कर्नाटक): मुले पळविण्यास आल्याच्या संशयावरून बिदर जिल्ह्याच्या औराद तालुक्यातील मुरकी गावात संतप्त जमावाकडून शुक्रवारी रात्री एका प्रवाशाची हत्या करण्यात आली, तर दोघांना जखमी केले. पोलिसांनी सांगितले की, मृताचे नाव मोहम्मद आझम व जखमींची नावे ेतल्हा इस्माइल व मोहम्मद सलमान अशी आहेत. हे तिघेही हैदराबादचे होते. मोहम्मद बशीर या मित्रासोबत हे तिघेही बशीरच्या औराद तालुक्यातील मुडीरका गावी मोटारीने जात होते. दरम्यान, मारहाणीत मृत्युमुखी पडलेला मोहम्मद आझम हा गुगलचा इंजिनिअरला होता, अशी माहिती समोर आली आहे.
हे तिघंही जण वाटेत ते बालकुट तांडा येथे चहापाण्यासाठी थांबले. हॉटेलच्या जवळून जाणाऱ्या लहान मुलांना बोलावून त्यांनी चॉकलेट्स दिली. त्यावरून ते मुले पळविणारे असावेत, असा गावक-यांनी संशय घेतला गेला. गावातील सर्वांनी जमून त्यांनी तिघांनाही बेदम मारहाण केली. अशाच कारणास्तव महाराष्ट्रात जळगावच्या राईनपाडा येथे पाच जणांची हत्या करण्यात आली होती. आसाम, तसेच त्रिपुरा या दोन राज्यांतही मुले पळविण्याच्या संशयातून काही जणांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना असे प्रकार घडू नयेत, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. यापैकी काही प्रकार सोशल मीडियातील अफवांमुळे घडल्याचे उघडकीस आले आहे. (वृत्तसंस्था)