- एसपी सिन्हापाटणा : एकीकडे देशात दिवाळीचा आनंद साजरा होत असताना खिगडया जिल्ह्यातील छमिसया गावी समाजकंटकांनी दलितांची ५० घरे जाळून त्यांना बेघर केले. समस्तिपूर येथील दुस-या घटनेत केमिस्टच्या हत्येच्या निषेधार्थ जमावाने हिंसक निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक ठार तर पाच जण जखमी झाले.एका केमिस्टची दोन दिवसांपूर्वी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्यामुळे समस्तिपूरच्या असाधी गावी गावकºयांनी जोरदार निदर्शने केली. जमाव हिंसक झाल्यानंतर पोलिसांनी गोळीबाराचा मार्ग अवलंबला असे समस्तिपूरचे पोलीस अधीक्षक दीपक रंजन यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी कार्यालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.खिगडया जिल्ह्यातील छमसिया गावी दिवाळीच्या पूर्वसंध्येला समाजकंटकांनी दलितांची ५० घरे जाळल्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. दोन जातींमध्ये वर्चस्व आणि जमिनीचा वाद होता. त्यातून संघर्षाची ठिणगी उडाल्यानंतर समाजकंटकांनी घरे जाळली. दलितांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी गोळीबारही केला.पीडित कुटुंबे रस्त्यावर आली असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून या लोकांना भांडीकुंडी आणि अन्य जीवनावश्यक मदत पुरविली आहे. या प्रकरणी गुन्हेगारांना हुडकून काढून शिक्षा ठोठावली जाईल. एफआयआर दाखल केला जात आहे, अशी माहिती खिगडयाच्या पोलीस अधीक्षक मीनुकुमारी यांनी दिली आहे.
बिहारमध्ये रक्तरंजित दिवाळी पोलीस गोळीबारात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 5:14 AM