नवी दिल्ली : पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी २०१४ वर्ष खूप महत्त्वाचे ठरले. जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान ६५. ८ लाख परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली व त्यातून थोडेथोडके नव्हे, तर तब्बल एक लाख कोटींचे बहुमोल परकीय चलन देशाला मिळाले. व्हिसा प्रणालीत आणखी सुटसुटीतपणा आणत केंद्राने ‘इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल आॅथोरायझेशन’ (ईटीए) प्रणाली सुरू करून महत्त्वाचे पाऊल टाकले. पर्यटन मंत्रालयाने नोव्हेंबर २०१४ मध्ये ईटीएद्वारे ४३ देशांतील नागरिकांना व्हिसा सुविधा सुरू केली. त्यामुळे अनेक किचकट प्रक्रियांतून पर्यटकांची मुक्तता होऊन तब्बल १६ हजार व्हिजांची प्रोसेसिंग झाली. परदेशी पर्यटकांसाठी ‘स्वागत कार्ड’ योजना सुरू करण्यात आली. त्याबरोबर बहुप्रतीक्षित ‘टुरिस्ट हेल्पलाईन’ सुरू केली. ही हेल्पलाईन २४ तास सुरू राहणार आहे. सध्या दोन भाषांमध्ये असलेली ही सुविधा लवकरच १० परदेशी भाषांमध्ये सुरू होणार आहे. परदेशी पर्यटकांना विमानतळावरच ‘स्वागत कार्ड’ देण्यात येईल, त्यावर सर्व महत्त्वाचे क्रमांक देण्यात येतील. श्रीपाद नाईक यांच्याकडून महेश शर्मा यांच्याकडे पर्यटन मंत्रालयाची सूत्रे देण्यात आल्यानंतर काही महत्त्वाच्या योजनांवर काम सुरू झाले. शर्मा यांनी इटली व सौदी अरेबिया या देशांच्या धर्तीवर भारतात धार्मिक पर्यटनावर लक्ष केंद्रित करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)४पर्यटन मंत्रालयाने ‘स्वच्छ भारत, स्वच्छ खाद्यपदार्थ’ योजनाही सुरू केली आहे. त्यामुळे परदेशी पर्यटक आकर्षित होऊ शकतील. रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ४मंत्रालयाने त्यासाठी ‘नॅशनल असोसिएशन आॅफ स्ट्रीट वेंडर्स आॅफ इंडिया’ (एनएएसव्हीआय) संघटनेशी करार केला आहे. संघटनेच्या सभासदांना स्वच्छ, दर्जेदार खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.४पर्यटनवाढीसाठी गंगा, बौद्ध, कृष्णा पट्ट्याबरोबरच पूर्वोत्तर राज्ये व केरळ अशी पाच मंडळे तयार करण्यात येणार आहेत. या पर्यटन स्थळांवर आधुनिक सुविधा पुरविण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.
पर्यटनाद्वारे एक लाख कोटींचे परकीय चलन!
By admin | Published: December 30, 2014 11:31 PM