लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशाला कोरोना साथीचा पडलेला विळखा आणखी घट्ट होत असून, गेल्या पाच दिवसांत सुमारे एक लाख नवे रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या सहा राज्यांत ८५ टक्के नवे रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या एक कोटी १३ लाख झाली असून, शुक्रवारी ११७ जणांचा बळी गेला.
शुक्रवारी देशात २३ हजारांहून जास्त नवे कोरोना रुग्ण सापडले. गेल्या ७८ दिवसांनंतरची ही सर्वाधिक संख्या आहे. देशात एक कोटी नऊ लाख ५३ हजार जण बरे झाले असून, कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४० टक्क्यांवर स्थिर आहे. या संसर्गाच्या बळींची एकूण संख्या एक लाख ५८ हजार आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख ९७ हजार असून, हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या १.७४ टक्के आहे. बरे झालेल्यांचे प्रमाण ९६.८६ टक्के आहे. गेल्या २४ डिसेंबर रोजी २४,७१२ नवे कोरोना रुग्ण सापडले होते. त्या आकड्याच्या जवळपास नवे रुग्ण शुक्रवारी आढळले. जगभरात ११ कोटी ९१ लाखांहून अधिक रुग्ण आहेत व त्यातील नऊ कोटी ४७ लाख लोक बरे झाले. दोन कोटी १७ लाख लोकांवर उपचार सुरू असून, २६ लाख ४२ हजार जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत अमेरिका प्रथम स्थानी, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे भारत व ब्राझील आहे.
चीनच्या प्रयोगशाळेतून विषाणू हवेत आला नाहीचीनच्या वुहान शहरातील प्रयोगशाळेतून कोरोनाचा विषाणू हवेत मिसळला असा कोणताही पुरावा उपलब्ध झालेला नाही. वन्यप्राण्यांद्वारेच हा विषाणू माणसांमध्ये संक्रमित झाला असण्याची शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
‘ॲस्ट्राझेनेका’ लसीचा ११ देशांनी वापर थांबवलालस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी निर्माण झाल्यानंतर युराेपमध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर युराेपमधील १० देशांसह एकूण ११ देशांनी ‘ॲस्ट्राझेनेका’च्या लसीचा वापर तात्पुरता थांबविला आहे.
भारतात होणार जॉन्सन ॲण्ड जॉन्सनच्या लसीचे उत्पादन
भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान या चार देशांच्या क्वाड गटाने एकत्रितपणे कोरोना साथीशी मुकाबला करण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमेरिकेत विकसित झालेल्या जॉन्सन ॲण्ड जॉन्सनच्या लसीचे भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणार आहे. या लसींचा दक्षिण आशिया तसेच प्रशांत महासागराच्या टापूतील देशांना पुरवठा करण्यासाठी ऑस्ट्रेलिया आपली जहाजे व साधनसामग्री वापरणार आहे.