सुरेश एस. डुग्गर -
जम्मू : संपूर्ण जगभरातून भाविक येत असलेल्या अमरनाथ यात्रेला अद्याप ३ महिन्यांचा कालावधी असला तरी तयारीने वेग घेतला आहे. यंदा भाविकांच्या सुरक्षेसाठी एक लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात येणार आहेत.
भाविकांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा मुद्दा यंदाही ऐरणीवर आला आहे. सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नसून, एक लाखावर जवान तैनात करण्यात येणार आहेत, असे सुरक्षाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अधिकृतरीत्या सुरक्षा दलांच्या २५० कंपनी सुरक्षेसाठी मागविण्यात आल्या आहेत. यात सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान असतील. लष्कर व राज्य पोलिस जवानांना अतिरिक्तरीत्या तैनात करण्यात येणार आहे.
यंदा ३ जुलै ते ९ ऑगस्ट यात्राअमरनाथ श्राईन बोर्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी अमरनाथ यात्रेत खूपच गर्दी होण्याची शक्यता आहे.तीन जुलैपासून सुरू होणारी अमरनाथ यात्रा नऊ ऑगस्ट म्हणजेच श्रावण पौर्णिमेपर्यंत चालेल.यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या निश्चित करण्यात आलेली नाही. सहभागी होणाऱ्यांना उत्तम प्रकृती असण्याशिवाय कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. १० लाखांपेक्षा अधिक लोकांना सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे.