कांकीनाराः पश्चिम बंगालमधल्या कांकीनारा भागात गावठी बॉम्बच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत. मोहम्मद मुख्तार (68) ही व्यक्ती या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, 24 परगणा जिल्ह्यातील काकीनारा भागात बरुईपाला येथे मृत मोहम्मद मुख्यार आणि त्याचा परिवार, तसेच शेजारी घराबाहेर बसले होते. त्याचदरम्यान कोणी तरी बॉम्ब फेकला.या बॉम्ब हल्ल्यात मुख्तारची पत्नी आणि अनेक लोक गंभीररीत्या जखमी झाले. गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीदरम्यानही अशाच प्रकारची हिंसा झाली होती. पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार उफाळला आहे. इथे मोठ्या प्रमाणात भाजपा आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी होत असते आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते यात जिवानिशी जात आहेत. तर या दोन्ही पक्षांचे नेतेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत सुटले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कार्यकर्त्यांची हत्या झाली होती. कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावरून शनिवारी भाजपाचे स्थानिक नेते आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. तसेच रविवारी अंत्यसंस्कारासाठी बशीरहाट येथील पक्ष कार्यालयात नेण्यात येणारे भाजपा कार्यकर्त्यांचे मृतदेह मध्येच अडवण्यात आले होते. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यातच या दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली होती.
पश्चिम बंगालमधल्या कांकीनारामध्ये गावठी बॉम्बचा हल्ला, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 11:48 AM