भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शपथ घेतल्यानंतर २९ दिवसांनंतर मंगळवारी पाच सदस्य मंत्रिमंडळाने शपथ घेतली. लॉकडाऊनमुळे राजभवनात एका साध्या समारंभात या सदस्यांना राज्यपाल लालजी टंडन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.मुख्यमंत्र्यांनी ज्या पाच सदस्यांना आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट केले आहे त्यात तुलसी सिलावट, गोविंद सिंह राजपूत, नरोत्तम मिश्रा, मीना सिंह आणि कमल पटेल यांचा समावेश आहे. यात तुलसी सिलावट आणि गोविंद सिंह राजपूत हे भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आहेत. हे दोघेही कमलनाथ यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या २२ समर्थक आमदारांसह काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते भाजपमध्ये दाखल झाले होते. या २२ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, तो मंजूरही झालेला आहे.23 मार्च रोजी शिवराज सिंह यांच्या नेतृत्वात भाजप सरकार सत्तेत आले होते. २४ मार्च रोजी त्यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले होते. आजच्या विस्तारात चौहान यांनी जातीय समीकरणही जपले आहे. या शपथविधी समारंभाला शिवराज सिंह चौहान, माजी केंद्रीय मंत्री उमा भारती, प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा आणि पोलीस महासंचालक विवेक जौहरी यांची उपस्थिती होती. दरम्यान, मुख्यमंत्री चौहान हे २९ दिवस एकटेच कॅबिनेट सदस्य होते. हे देशातील रेकॉर्ड आहे. मध्यप्रदेशात मुख्यमंत्र्यांसह ३४ सदस्य मंत्रिमंडळात सहभागी होऊ शकतात. लॉकडाऊननंतर विस्तार होऊ शकतो.
मध्यप्रदेशात मंत्रिमंडळ विस्तार; चौहान यांच्या सरकारमध्ये पाच मंत्र्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 1:47 AM