नवी दिल्ली, दि. ३ - पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील चकमक अजूनही संपलेली नाही. दबा धरुन बसलेल्या दोन अतिरेक्यांपैकी एकाला ठार मारण्यात आले असून, दुस-याचा शोध सुरु आहे. दुपारी बाराच्या सुमारास पुन्हा येथे सुरक्षापथके आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरु झाली. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पुन्हा गोळीबार झाला त्यानंतर एकवाजता स्फोटाचा आवाज ऐकू आला.
सकाळी शोधमोहिमे दरम्यान अतिरेक्यांनी परेलेली आईडी स्फोटके निष्क्रीय करताना झालेल्या स्फोटामध्ये एनएसजीचे लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार शहीद झाले तर, तीन जवान जखमी झाले. एनएसजी, गरुडा कमांडो आणि अन्य सुरक्षापथक संयुक्तपणे कारवाई करत असून, विविध सुरक्षायंत्रणांचे अधिकारी या ऑपरेशनवर लक्ष ठेऊन आहेत.
या हल्ल्यात भारताने आतापर्यंत आपले १० जवान गमावले आहेत. यात संरक्षण दलाचे सहा, हवाई दल आणि गुरुडचे प्रत्येकी दोन जवान आहेत. इथल्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षापथकांनी हॅलिकॉप्टरची मदत घेतली आहे.
शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातून आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला चढवला तेव्हापासून चकमक सुरु आहे. शनिवारी भारतीय सुरक्षा पथकांनी पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. त्यामुळे चकमक संपली असे वाटले होते.
मात्र रविवारी सकाळी शोधमोहिम सुरु झाल्यानंतर दबा धरुन बसलेले दोन अतिरेकी समोर आले. अतिरेक्यांचा नेमका आकडा अजूनही स्पष्ट झालेला नाही. मृत अतिरेक्यांकडे एके-४७ रायफल, ग्रेनेड लॉंचर आणि जीपीएस डिवाईस सापडले आहेत.