भरतपूर:राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील भगवान कृष्णाचे क्रीडांगण असलेल्या आदिबाद्री परिसरात अवैध खाणकाम थांबवण्याची मागणी करत बाबा हरिबोल दास मंगळवारी मोबाईल टॉवरवर चढले. 24 तास उलटूनही बाबा हरिबोल दास टॉवरवरुन उतरले नाहीत. सरकारने या भागातील खाणकाम बंद करून ते वनक्षेत्र घोषित करावे, अशी त्यांची अट आहे. या मागणीबाबत बाबा हरिबोल दास यांनी दोन दिवसांपूर्वी आत्मदहनाचा इशाराही दिला होता.
550 दिवसांपासून आंदोलन त्यांच्या इशाऱ्यानंत राजस्थान सरकारचे कॅबिनेट मंत्री विश्वेंद्र सिंह त्यांचे मन वळवण्यासाठी आले होते. साधू आणि मंत्री यांच्यात संवाद झाला, मात्र त्यावर बाबा हरिबोल दास यांचे समाधान झाले नाही आणि ते मंगळवारी मोबाईल टॉवरवर चढले. आदिबद्री भागातील खाणकाम बंद करण्याच्या मागणीसाठी गेल्या 550 दिवसांपासून साधूंचे आंदोलन सुरू आहे. मात्र आजपर्यंत यावर तोडगा निघालेला नाही.
एका साधूने स्वतःला पेटवून घेतलेदरम्यान, याप्रकरणी ठिय्या आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी एका साधूने ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटवून घेतले. यामुळे ते गंभीर भाजले. त्यांना गंभीर अवस्थेत प्रशासनाने डीईजी रुग्णालयात दाखल केले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आता पोलीस प्रशासनात घबराट पसरली आहे. साधू आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. पळसोपा गावात साधू-संतांचे हे आंदोलन सुरू आहे.
या परिक्रमा मार्गात श्रीकृष्णाची अनेक मंदिरे ज्या भागात अवैध उत्खनन होत आहे, तो परिसर गोवर्धन परिक्रमा मार्गाचा परिसर आहे. हा परिसर भगवान श्रीकृष्णाचे क्रीडांगण मानला जातो. हा उत्तर प्रदेशातील मथुरेजवळ आहे. गोवर्धन पर्वताच्या या परिक्रमा मार्गात भगवान श्रीकृष्णाशी संबंधित अनेक मंदिरे आहेत कृष्णाच्या या भूमीला वाचवण्यासाठी साधू संत अनेक वर्षांपासून झटत आहेत, मात्र त्यांचे ऐकले जात नाही. आता हे प्रकरण बाबा हरिबोल दास टॉवरवर चढल्यामुळे सोशल मीडियातही चर्चेत आले आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.