लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : 'एक देश, एक निवडणूक' या गोष्टीशी संबंधित १२९वी घटनादुरुस्ती विधेयक, केंद्रशासित प्रदेश कायदेविषयक दुरुस्ती विधेयक ही दोन विधेयके केंद्रीय विधिमंत्री अर्जुन मेघवाल सोमवारी लोकसभेत मांडणार आहेत.
लोकसभेसोबतच राज्य विधानसभांच्या निवडणुका घेण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत गुरुवारी मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता त्याच्याशी संबंधित आणखी दोन विधेयके लोकसभेत मांडण्यात येणार आहेत. विधानसभा असलेल्या तीन केंद्रशासित प्रदेशांनाही 'एक देश, एक निवडणूक' हे तत्त्व लागू व्हावे यादृष्टीने एक विधेयक तयार करण्यात आले आहे. त्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती.
लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रितरीत्या घेण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे. मात्र या विषयासंदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने लोकसभा, विधानसभेबरोबर पालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही एकत्रितरीत्या घेतल्या जाव्यात, अशी शिफारस केली होती. मात्र ग्रामपंचायत, पालिका यांच्या निवडणुका एकत्रित घेण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय न घेण्याचे धोरण सध्या ठरविले आहे.