One Nation One Election: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी महत्वाचं विधान केलं आहे. निवडणुकीचे कल हाती येण्यास सुरुवात होत असतानाच सुशील चंद्रा यांच्या विधानानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "एक देश एक निवडणूक हा एक चांगला पर्याय आहे. पण त्यासाठी राज्यघटनेत बदल करण्याच गरज आहे", असं सुशील चंद्रा म्हणाले.
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आण गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल आज हाती येणार आहेत. यासाठीची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आहे. निकालाचे पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत 'एक देश एक निवडणूक'बाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
"वन नेशन-वन इलेक्शन हा एक चांगला पर्याय आहे. पण त्यासाठी राज्यघटनेत बदल करण्याची गरज आहे. निवडणूक आयोग पूर्णपणे यासाठी सज्ज आहे. सर्व निवडणूका एकाचवेळी घेण्यास आम्ही सक्षम आहोत. आम्ही पाच वर्षात देशात एकदाच निवडणूक कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करू शकतो", असं सुशील चंद्रा म्हणाले.