कोची : केंद्र सरकारने ‘एक देश, एक निवडणूक’ या धोरणाची व्यवहार्यता अभ्यासण्यासाठी समिती स्थापन करण्याव्यतिरिक्त कोणतीही घोषणा केलेली नाही. असे असले तरी देशभरात मात्र वाद-विवाद आणि चर्चा झडत आहेत. या धोरणाबाबत विरोधी पक्षांचे एकमत असले तरी केंद्राने निर्णय घेतल्यास भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे, हे जाणून घेण्यासाठी तर्कवादी आणि कम्युनिस्टांसह बरेच जण ज्योतिषींशी संपर्क करीत आहेत.
“अनेक लोक मला नवी दिल्ली, चेन्नई किंवा कोलकाता येथून फोनवर कॉल करतात. त्यांना जाणून घ्यायचे आहे की आगामी निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडी यशस्वी होईल की नाही, त्यांना लढण्यासाठी पक्षाचे तिकीट मिळेल की नाही आणि मिळाले तर ते निवडणूक जिंकतील का,” असे केरळमधील अग्रगण्य ज्योतिषी म्हणाले. त्यांचा ग्राहकवर्ग आशिया आणि युरोपपर्यंत पसरला आहे. “ज्यांनी मला फोन लावले त्यामध्ये राजकारणी आणि विश्लेषकांचा समावेश आहे, जे लोकांना वैज्ञानिक मनोवृत्ती विकसित करण्याचे आणि ज्योतिषासारख्या गोष्टींवर वेळ वाया न घालवण्याचे आवाहन करतात,’ असेही ज्योतिषाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
‘काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षात असे राजकारणी आहेत ज्यांना हे जाणून घ्यायचे आहे की त्यांना भाजपमध्ये गेल्यास फायदा होईल की नाही? कृपया या व्यक्तींची नावे मात्र विचारू नका, कारण ते कोण आहेत हे मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला धक्का बसेल,’ असा दावा एका दुसऱ्या ज्योतिषाने केला. कोइम्बतूर आर्यवेद शाळेचे (आयुर्वेदिक रुग्णालय) प्रमुख असलेले दिवंगत डॉ. कृष्ण कुमार यांनी स्वतः एका प्रसिद्ध वैद्यांकडून पारंपरिक गुरुकुल पद्धतीने वैद्यकी शिक्षण घेतले. त्यांची रुग्ण तपासण्याची पद्धत होती की, ते आपल्या रुग्णांना प्रथम तारीख, वेळ, वर्ष आणि जन्म ठिकाण याबद्दल विचारत असत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. कुमार यांच्या निदान शैलीतील तपशीलांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.