'वन नेशन, वन रेशनकार्ड' योजनेसंदर्भात सुप्रीम कोर्टानं आज मोठा निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टानं देशातील सर्व राज्यांना ३१ जुलैपर्यंत 'वन नेशन, वन रेशनकार्ड' योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अशोक भूषण यांच्या खंडपीठानं आज याबाबतचा निकाल दिला आहे. (One Nation One Ration Card Supreme Court sets July 31 as deadline for States to implement scheme)
देशातील सर्व राज्यांनी तातडीनं 'वन नेशन, वन रेशनकार्ड' योजना लागू करणं खूप गरजेचं आहे. जेणेकरुन प्रवासी मजुरांना देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल, असं कोर्टानं म्हटलं आहे. कोरोनामुळे स्थलांतरीत कामगारांच्या सोयी-सुविधांसंदर्भात संबंधित राज्य सरकारांना यावेळी सुप्रीम कोर्टानं उत्तम नियोजन करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. प्रवासी मजुरांना अन्नधान्य उपलब्ध करुन देणं आणि त्यांच्यासाठी 'कम्युनिटी किचन' यापुढील काळातही सुरु ठेवण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत.