नवी दिल्ली : ‘वन रँक, वन पेन्शन’च्या (ओआरओपी) मागणीवर गुरुवारीही कुठलाच तोडगा निघू शकला नसताना या मागणीसाठी उपोषणावर बसलेल्या माजी सैनिकांनी सरकारवर सतत ‘गोलपोस्ट’ अर्थात सूर बदलल्याचा आरोप केला आहे. बुधवारी माजी सैनिकांनी थेटपणे अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य करीत, त्यांच्यामुळेच ओआरओपीवर तोडगा निघू शकत नसल्याचा आरोप केला होता. गुरुवारी आंदोलनकर्त्या माजी सैनिकांनी थेटपणे सरकारला लक्ष्य केले. सरकारचे काही लोक योजना लागू केल्यानंतरच्या वित्तीय प्रभावांबाबत भ्रमित करणारी आकडेवारी देत असल्याचे माजी सैनिकांच्या संयुक्त मोर्चाचे मीडिया सल्लागार अनिल कौल म्हणाले. सरकारने आमच्याशी चर्चा करण्यासाठी सात मध्यस्थ पाठवले; पण हे सर्व वेगवेगळे प्रस्ताव घेऊन आमच्याकडे आले. सरकार सतत आपला सूर बदलत आहे. सरकारचे लोक आधी एक बोलतात मग दुसरे. सरकारकडून आम्हाला कुठलेही स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत वा कुठलाही ठोस प्रस्ताव, असे ते म्हणाले. तीन टक्के वाढीचा आमचा प्रस्ताव नाहीच. हा चुकीचा प्रचार आहे, असेही ते म्हणाले.
‘वन रँक, वन पेन्शन’ : तोडगा नाहीच
By admin | Published: September 03, 2015 10:07 PM