पाटणा - कोरोनाने आता बिहारमध्येही शिरकाव केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाटणा येथे राजेंद्र मेमोरियल रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये (RMRI) दोन रुग्णांच्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचे समजते.
आरोग्य विभागाचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तो पाटणा येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत किडनीवरील उपचार घेत होता. तो मुंगेर जिल्ह्यातील रहिवासी होता. संजय कुमार यांनी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचीही पुष्टी केली आहे. मात्र, याप्रकरणात आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव आणि आरएमआरआयचे संचालक यांच्या प्रतिक्रिया भिन्न आहेत.
देश भरातील कोरोना बाधितांचा आकडा आता 329वर पोहोचला आहे. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील जवळपास 170 हून अधिक देशांतील 3,05,046 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 13,029 जणांचा मृत्यू झाला आहे.
रात्री उशिरापर्यंत 114 सॅम्पल्सची तपासणीपाटणा येथील आरएमआरआयचे संचालक डॉ. प्रदीप दास यांनी सांगितल्यानुसार, रात्री उशिरापर्यंत केलेल्या तपासणीत कोरोनाचे दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यादरम्यान एकूण 114 नमुने तपासले गेले. यासंदर्भात दिल्लीतील आयसीएमआर, राज्याचे आरोग्यमंत्री आणि मुख्य सचिवांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांनी, आरोग्य सचिव आणि आरएमआरआयचे संचालक यांच्या पेक्षा काहीशी वेगळी माहिती दिली आहे. त्यांनी बिहारमधील कोरोनासंदर्भात अद्याप याची पुष्टी झालेली नसल्याचे म्हटले आहे.
देशभरात 23 जण ठणठणीत होऊन घरी परतले
देशभरात आतापर्यंत 329 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 300 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 23 जण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
महाराष्ट्रात आणखी एकाचा मृत्यू - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. 63 वर्षीय व्यक्तीचा मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. 19 मार्चला त्या व्यक्तीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. देशातील हा कोरोनाने दगावलेला पाचवा बळी आहे.
राज्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्याही 74 झाली असून, दिवसभरात 10 नवे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी राज्यात कोरोनाचे पुण्यात 2, मुंबईत 8, यवतमाळ व कल्याणमध्ये प्रत्येकी 1 असे 12 नवे रुग्ण आढळले होते.